ऑनलाइन गेमविरोधात ग्राहक पंचायत मैदानात #chandrapur #Onlinegame

Bhairav Diwase
चंद्रपूर:- मागील काही वर्षांमध्ये मोठ्या प्रमाणात ऑनलाइन गेम सुरू आहे. यामुळे तरुणांसह बालकांमध्येही व्यसन जडले असून, त्याचे भीषण स्वरूप सध्या बघायला मिळत आहे. विशेषतः हिरो, क्रिकेटर या गेमच्या जाहिराती करीत असल्याने लहान वयामध्ये बालक आकर्षित होत आहेत.

त्यामुळे ऑनलाइन गेम त्वरित बंद करून भविष्यातील पिढीला वाचविण्यासाठी ग्राहक पंचायत मैदानात उतरली आहे. या विरोधात केंद्र सरकारला निवेदन पाठविण्यात आले आहे. दरम्यान, जाहिरात करणाऱ्या सेलिब्रिटींनाही जाहिरात बंद करण्याची विनंती केली आहे.

या विरोधात अखिल भारतीय ग्राहक पंचायत जिल्हा चंद्रपूरने केंद्र सरकारला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत निवेदन पाठविले आहे. अखिल भारतीय ग्राहक पंचायतच्या पदाधिकारी नंदिनी चुनारकर, संगीता लोखंडे, सुषमा साधनकर, अण्याजी ढवस, प्रभातकुमार तन्नीरवार, हेमराज नंदेश्वर, अशोक मुडेवार, जितेंद्र चोरडिया यांच्या नेतृत्वाखाली निवेदन पाठविले आहे. ऑनलाइन गेम हा सर्वांसाठी धोकादायक ठरत आहे. यामुळे अनेक दुष्परिणामांचा सामना समाजाला करावा लागत असल्याने ऑनलाइन गेम त्वरित बंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

सेलिब्रिटींनाही निवेदन

ऑनलाइन गेमच्या जाहिराती काही सेलिब्रिटी करीत आहेत. त्यापैकी महेंद्रसिंग धोनी, ऋतिक रोशन, शाहरुख खान यांना ग्राहक पंचायतने निवेदन पाठवून या प्रकरणाकडे लक्ष वेधले आहे. सेलिब्रिटी आपल्या प्रसिद्धीसाठी जाहिराती करतात. परंतु समाजमनावर त्याचे मोठ्या प्रमाणात दुष्परिणाम होतात. त्यामुळे शासनाने त्वरित ऑनलाइन गेम बंद करून तरुण पिढीला वाचवावे, असे आवाहनही ग्राहक पंचायतने निवेदनाद्वारे केले आहे.