सायबर गुन्ह्यांचा वाढता धोका बघता सुरक्षाही तितकीच महत्वाची:- मुजावर अली #chandrapur

Bhairav Diwase
सरदार पटेल महाविद्यालयात 'सायबर सेक्युरिटी'वर परिसंवाद

चंद्रपूर:- आजच्या माहिती व तंत्रज्ञान नाच्या युगात अधिकाधिक संस्था डिजिटल परिवर्तनाचा अवलंब करत असल्याने सायबर गुन्ह्यांचा धोका वेगाने वाढत आहे. परिणामी सायबर सुरक्षेचे महत्त्वही अधिक असल्याचे प्रतिपादन चंद्रपूर पोलीस विभागाच्या सायबर सेलचे अधिकारी मुजावर अली यांनी येथे बोलताना केले.

चंद्रपूर येथील सरदार पटेल महाविद्यालयात संगणक शास्त्र विभागाच्या वतीने 'सायबर सुरक्षे'वर आधारित परिसंवादात ते बोलत होते. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर हे होते.

यावेळी बोलतांना मुजावर अली पुढे म्हणाले की, सायबर हल्ले हे संस्था, कर्मचारी आणि ग्राहकांसाठी विकसित होत असलेला धोका आहे. ते हल्ले संवेदनशील 'डेटा'मध्ये प्रवेश करण्यासाठी वा नष्ट करण्यासाठी किंवा पैसे उकळण्यासाठी डिझाइन केलेले असू शकतात. ते प्रत्यक्षात, व्यवसाय नष्ट करू शकतात आणि तुमच्या आर्थिक आणि वैयक्तिक जीवनाचे नुकसान करू शकतात.त्यामुळे 'सोशल मीडिया' सक्रिय राहताना सतर्कता बाळगणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.२०२३ मध्ये चंद्रपूर जिल्ह्यात १ हजार ४८१ सायबर गुन्ह्यांची नोंद झाल्याचे त्यांनी सांगितले.

आपल्या अध्यक्षीय भाषणातून बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. काटकर म्हणाले की, सायबर हल्ल्यांबाबतची जोखीम कमी करण्यासाठी विविध प्रकारच्या सायबर सुरक्षा उपायांची आवश्यकता असते, त्याची माहिती ठेवणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे संचालन इरफान शेख,तर आभारप्रदर्शन संगीता पिदूरकर यांनी केले. यावेळी महाविद्यालयातील प्राध्यापक,शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दरम्यान सर्वोदय शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष अरविंद सावकार पोरेड्डीवार, उपाध्यक्ष सुदर्शन निमकर, सर्वोदय शिक्षण मंडळाचे सचिव प्रशांत पोटदुखे, सहसचिव डॉ. किर्तीवर्धन दीक्षित, सदस्य आ. किशोर जोरगेवार, सगुणाताई तलांडी, राकेश पटेल, संदीप गड्डमवार, सुरेश पोटदुखे, जिनेश पटेल, चंद्रशेखर वाडेगावकर यांनी उपरोक्त उपक्रमाबद्दल शुभेच्छा दिल्यात.