पहलगाम हल्ल्यापासून भारत आणि पाकिस्तानमधील तणाव वाढला आहे. पहलगाम हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त केले आहे.
बिथरलेल्या पाकिस्तानाने प्रत्युत्तर म्हणून सीमेवर सातत्याने गोळीबार सुरु ठेवला आहे. त्यामुळे भारतात सुरक्षा यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दुसरीकडे, सीमाभागातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यात आले असून अनेक भागातील शाळा बंद ठेवल्या आहेत. अशातच भारत-पाकिस्तान तणावादरम्यान विद्यापीठ अनुदान आयोगाकडून देशभरातील अनेक परीक्षा रद्द झाल्याची माहिती देणारी पोस्ट व्हायरल होतेय. मात्र ही माहिती खोटी असल्याचे समोर आलं आहे.
ऑपरेशन सिंदूरनंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणावाच्या काळात यूजीसीच्या नावाने बनावट पोस्ट व्हायरल होत आहेत. सोशल मीडियावर एक फेक न्यूज मोठ्या प्रमाणात व्हायरल झालीय, ज्यामध्ये भारत-पाकिस्तान तणावामुळे सर्व परीक्षा रद्द करण्यात आल्या आल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र आता यूजीसीने स्पष्टीकरण देत ही बातमी पूर्णपणे खोटी असल्याचे म्हटलं आहे.
विद्यापीठ अनुदान आयोगाकडून असे कोणतीही सूचना जारी केली नसल्याचे यूजीसीने म्हटलं. जर कोणतीही परीक्षा रद्द झाली तर ती फक्त यूजीसीच्या अधिकृत वेबसाइटवर किंवा त्यांच्या सोशल मीडिया चॅनेलवर कळवली जाईल, असेही सांगण्यात आले आहे.
⚠️ FAKE NOTICE ALERT ⚠️
— UGC INDIA (@ugc_india) May 7, 2025
A fabricated public notice is being circulated under the name UGC, claiming that all exams are cancelled due to a war situation and advising students to return home.
UGC confirms this notice is fake. There are no such directions from UGC.
🔹 All… pic.twitter.com/JHSlQ3uBUp
"फेक न्यूज अलर्ट. काही लोक यूजीसीच्या नावाखाली खोटी माहिती पसरवत आहेत की युद्धामुळे परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत आणि विद्यार्थ्यांना घरी जाण्यास सांगण्यात आले आहे.ही सूचना खोटी आहे आणि यूजीसीकडून असे कोणतेही निर्देश नाहीत. सर्व अधिकृत अपडेट्स फक्त यूजीसी वेबसाइट आणि यूजीसीच्या अधिकृत सोशल मीडिया चॅनेलवर आहेत," असे या पोस्टमध्ये म्हटलं आहे.
ही फेक न्यूज असून असे खोटे मेसेज पसरवणे हा दंडनीय गुन्हा आहे असेही यूजीसीने स्पष्ट केले. ऑपरेशन सिंदूर अंतर्गत भारताने पाकिस्तानमध्ये हवाई हल्ले केल्यानंतर ही अफवा पसरवण्यात आली आहे. ऑपरेशन सिंदूरमुळे युद्धसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जात होती.
यूजीसीने विद्यार्थ्यांना दिल्या महत्त्वाच्या सूचना
१.खोट्या माहितीला बळी पडू नका
२.सतर्क रहा
३. फक्त अधिकृत यूजीसी स्रोतांवर विश्वास ठेवा.