Click Here...👇👇👇

MLA Devrao Bhongale: आमदार देवराव भोंगळे यांचा 'आमदार आपल्या दारी' अभिनव उपक्रम

Bhairav Diwase

कोरपना:- राजुरा विधानसभा मतदारसंघाचे आमदार देवराव भोंगळे यांनी आपल्या कामाच्या पद्धतीतून संपूर्ण मतदारसंघात एक वेगळीच ऊर्जा निर्माण केली आहे. जनसामान्यांचे प्रश्न तात्काळ सुटावेत यासाठी ते नेहमीच प्रयत्नशील असतात आणि याच उद्देशाने ते दररोज सकाळी आपल्या जनसंपर्क कार्यालयात 'जनता दरबार' आयोजित करतात. आता हे प्रश्न आणखी तळागाळातील नागरिकांपर्यंत पोहोचावेत आणि त्यांचे निराकरण व्हावे यासाठी आमदार देवराव भोंगळे यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रात प्रथमच एक अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. 'आमदार आपल्या दारी' या गावभेट दौऱ्याचे नियोजन त्यांनी कोरपना तालुक्यातील गावांमध्ये केले आहे.

या उपक्रमांतर्गत, ग्रामसेवक, मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी विभाग, बांधकाम विभाग, आरोग्य विभाग, वन विभाग, विद्युत वितरण विभाग, पोलीस स्टेशन, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग इत्यादी महत्त्वाच्या विभागांचे संबंधित अधिकारी व कर्मचारी उपस्थित राहणार आहेत. यामुळे नागरिकांना एकाच ठिकाणी आपल्या विविध समस्या मांडता येणार आहेत आणि त्यावर तात्काळ तोडगा काढता येणार आहे.

या दौऱ्यात उद्या, २८ जून रोजी कोरपना तालुक्यातील नारंडा, माथा, शेरज खुर्द, शेरज बू, हेटी, कोडशी खुर्द, तांबाडी, कोडशी बू, गांधीनगर आणि तुळशी या गावांचा समावेश आहे. या गावांच्या नागरिकांना आता आपले प्रश्न थेट आमदारांसमोर आणि संबंधित अधिकाऱ्यांसमोर मांडण्याची संधी मिळणार आहे, ज्यामुळे प्रशासकीय कामे अधिक सुलभ होतील आणि नागरिकांना दिलासा मिळेल. आमदार देवराव भोंगळे यांचा हा 'आमदार आपल्या दारी' उपक्रम खऱ्या अर्थाने लोककल्याणकारी ठरणार असल्याची चर्चा सध्या मतदारसंघात सुरू आहे.