चंद्रपूर:- चंद्रपूर शहरासह विदर्भातील तीन जिल्ह्यांतील शेकडो बेरोजगार तरुणांची राजस्थानच्या कंपनीने नोकरी आणि लाखोंच्या कमाईचे आमिष दाखवून फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेने (मनसे) या प्रकरणाला वाचा फोडली असून, यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षकांना पीडित तरुणांना न्याय मिळवून देण्यासाठी एक निवेदन सादर केले आहे. तसेच या प्रकरणी सखोल चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणीही यावेळी करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, मागील दोन वर्षांपासून चंद्रपूर शहरातील बाबुपेठ येथील मराठा चौकात ट्रेंडस्टिक वेंचर्स प्रायव्हेट लिमिटेड या राजस्थानच्या कंपनीने आपले बस्तान मांडले होते. या कंपनीद्वारे शेकडो तरुण बेरोजगारांना नोकरीची हमी देऊन आणि कापडांची मार्केटिंग करून लाखो रुपये कमावण्याचे स्वप्न दाखवण्यात आले. प्रत्येक तरुणाकडून ११ हजार ते ४६ हजार रुपये घेऊन त्यांना निकृष्ट दर्जाचे कापडी ड्रेस दिले जात होते आणि त्याची मार्केटिंग करायला लावले जात होते.
दरम्यान, या कंपनीच्या राजस्थानमधील संचालकांनी आपला गाशा गुंडाळला. मात्र, पैशांची मोठ्या प्रमाणात आवक होत असल्याचे पाहून काही परप्रांतीय लोकांनी स्थानिक तरुणांना हाताशी धरून त्याच ठिकाणी डेली ग्रोथ इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या नावाने पुन्हा एक कंपनी सुरू केली आणि गरीब बेरोजगार तरुणांची फसवणूक सुरूच ठेवली.
वणी येथील रहिवासी असलेल्या तीन मुली आणि एका मुलाचीही या कंपनीकडून फसवणूक झाली असून, त्यांनी मनसे कार्यालयाशी संपर्क साधून आपली व्यथा मांडली. कपडे विकल्यास किंवा कंपनीशी लोकांना जोडल्यास कमिशन मिळेल, असे आमिष दाखवण्यात आले होते. परंतु, चंद्रपुरात अगोदरच मोठमोठी कापडांची दुकाने असताना बाहेरून आलेल्या कंपनीचे कपडे कोण घेणार, असा प्रश्न निर्माण झाल्याने अनेक तरुण बेरोजगार अर्ध्यातूनच काम सोडून आपल्या गावी परतले. मात्र, त्यांचे प्रत्येकी ११ हजार ते ४६ हजार रुपये कंपनीने हडपले आहेत.
या फसवणुकीमुळे अनेक तरुण मुलामुलींनी पैसे भरण्यासाठी आपल्या आईवडिलांकडून पैसे मागितले. काही जणांनी स्वतःचे मंगळसूत्र विकले, तर काहींनी आपल्या दुचाकी विकून मुलींसाठी पैसे दिले. आज ते सर्व पैसे कंपनीने बुडवल्याने अनेक तरुण बेरोजगारांवर आत्महत्या करण्याची वेळ आल्याची गंभीर बाब समोर आली आहे.
या प्रकरणासंदर्भात बोलताना मनसे कामगार सेनेचे जिल्हाध्यक्ष अमन अंधेवार यांनी सांगितले की, "पीडित तरुण बेरोजगारांना न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहोत." यावेळी फसवणुकीला बळी पडलेले अनेक तरुण मुलामुली उपस्थित होते.