Gram sevak trapped in flood water : ग्रामसेवक पुराच्या पाण्यात अडकले; जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेमुळे वाचले प्राण!

Bhairav Diwase

गडचिरोली:- जिल्हा प्रशासनाच्या तत्परतेमुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. मुलचेरा तालुक्यातील गोमणी येथील ग्रामसेवक उमेश धोडरे (वय ४५ वर्षे) हे आज सायंकाळी ६.०० वाजताच्या सुमारास कोलपल्ली नाल्याच्या अचानक वाढलेल्या पुराच्या पाण्यात अडकले.



धोडरे हे आपल्या चारचाकी वाहनासह नाला ओलांडत असताना, पाण्याचा जोरदार लोंढा आला आणि त्यांचे वाहन वाहून गेले. मात्र, श्री. धोडरे यांनी प्रसंगावधान राखत जवळच्या एका झाडाला घट्ट पकडून ठेवले.


या घटनेची माहिती मिळताच, गडचिरोली जिल्ह्यातील महसूल विभाग, पोलीस विभाग आणि स्थानिक बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. सर्व विभागांनी अतिशय काळजीपूर्वक आणि समन्वयाने बचाव कार्य राबवले. अथक प्रयत्नांनंतर श्री. धोडरे यांना सुरक्षित रित्या पुराच्या पाण्यातून बाहेर काढण्यात आले. बचावल्यानंतर त्यांना तातडीने प्राथमिक आरोग्य तपासणीसाठी रुग्णवाहिकेतून त्यांच्या घरी रवाना करण्यात आले.


जिल्हा प्रशासनाच्या वेळीच घेतलेल्या या कृतीमुळे एक मोठी दुर्घटना टळली आहे. या घटनेनंतर जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जनतेला आवाहन केले आहे की, मुसळधार पावसामुळे नाल्यांना अचानक पूर येण्याच्या घटना वाढल्या आहेत. त्यामुळे अशा ठिकाणी प्रवास करताना अत्यंत सावधगिरी बाळगावी आणि पूलावरून पाणी वाहत असताना पाण्यातून गाडी नेण्याचा धोका पत्करू नये.


या घटनेमुळे पावसाळ्यात सुरक्षिततेची काळजी घेणे किती महत्त्वाचे आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.