मुंबई:- राज्यातील नागरिकांसाठी सरकारकडून विविध योजना सुरू करण्यात येत असतात. यापैकी काही योजना शेतकऱ्यांसाठी, काही योजना महिलांसाठी, काही योजना अल्प उत्पन्नधारकांसाठी, काही योजना व्यापाऱ्यांसाठी फायदेशीर असतात.
मात्र, याच योजनांच्या आधारावर अनेकदा फसवणुकीचे सुद्धा प्रकार समोर येतात. आता सोशल मीडियात 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' संदर्भात मेसेज व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या मेसेजमागचं सत्य काय?
जाणून घेऊयात...
सोशल मीडियात मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजनाचा मेसेज व्हायरल होत आहे. व्हायरल मेसेजमध्ये विद्यार्थ्यांना दरमहा 4000 रुपये दिले जात असल्याचा दावा केला जात आहे. जाणून घेऊयात व्हायरल होत असलेल्या मेसेजमध्ये नेमकं काय म्हटलं आहे.
काय आहे व्हायरल पोस्ट?
व्हायरल मेसेजमध्ये म्हटलं, 5वी ते 12वीच्या विद्यार्थ्यांना सूचना... मुख्यमंत्री बाल आशिर्वाद योजना... आपणा सर्वांना विनंती आहे की, 1 मार्च 2020 नंतर ज्यांचे दोन्ही पालक किंवा त्यांच्या पालकांपैकी एकाचा मृत्यू झाला आहे आणि मुलांचे वय 18 वर्षापेक्षा कमी आहे. अशा कुटुंबातील दोन मुलांना मुख्यमंत्री बाल सेवा योजनेअंतर्गत प्रत्येकी 4000 रुपये दरमहा मिळणार आहेत. हा लाभ जास्तीत जास्त लोकांना द्या.
सत्य काय?
मुख्यमंत्री आशीर्वाद योजनेच्या संदर्भात आता राज्य सरकारकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे. अशा प्रकारची कोणतीही योजना नसल्याचं सरकारने म्हटलं आहे. समाजमाध्यमांवर 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजने'बाबत पोस्ट अपलोड करण्यात आली आहे. महाराष्ट्रात शालेय शिक्षण विभागाअंतर्गत 'मुख्यमंत्री बाल आशीर्वाद योजना' अशा नावाची कोणतीही योजना अस्तित्वात नाही. त्यामुळे, व्हायरल झालेल्या पोस्टमधील सर्व दावे हे खोटे ठरतात. व्हायरल नोटीसवर कोल्हापूरच्या इचलकरंजी येथील वेंकटराव हायस्कूलच्या मुख्याध्यापिका यांची स्वाक्षरी आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी हा संदेश खोटा असल्याचे स्पष्ट केले आहे.