चंद्रपूर:- राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यसाय मंत्री, आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव व लगतच्या गावांमध्ये वैनगंगा नदीच्या पुरामुळे झालेल्या नुकसानीची गंभीर दखल घेत मदतीसाठी तातडीने पुढाकार घेतला आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी चंद्रपूर जिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याचे निर्देश दिले आहेत. पुरामुळे अनेकांच्या घरांचे व शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, शासकीय मदत लवकरात लवकर पूरग्रस्त नागरिकांपर्यंत पोहोचावी यासाठी युद्धपातळीवर कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत.
आ. सुधीर मुनगंटीवार यांनी दिलेल्या निर्देशानुसार चंद्रपूर जिल्हाधिकारी आज (दि. १०) प्रत्यक्ष पोंभूर्णा तालुक्यातील जुनगाव व लगतच्या गावांमध्ये येथे भेट देऊन पुरग्रस्त भागाची पाहणी करणार आहेत.
या संकट काळात नुकसानग्रस्त नागरिकांना दिलासा देणे हे आपले नैतिक कर्तव्य असल्याचे सांगत, आ. मुनगंटीवार यांनी भाजप पदाधिकाऱ्यांना उद्या प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन नागरिकांना सर्वतोपरी सहकार्य करण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रशासनाशी समन्वय ठेवून मदतीसाठी प्रयत्नशील राहण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
दरम्यान, चालू पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर आमदार सुधीर मुनगंटीवार स्वतः जुनगाव येथे भेट देऊन पुरग्रस्त भागाची सविस्तर पाहणी करणार असून, नागरिकांच्या अडचणी समजून घेत त्या सोडवण्यासाठी संबंधित यंत्रणांकडून ठोस निर्णय घेतले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.