चंद्रपूर:- जिल्ह्यात सुरू असलेल्या पावसाच्या संततधारेमुळे अनेक तालुक्यांमध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यातच जिल्ह्यातील काही तालक्यांना पुराचा चांगलाच तडाखा बसला असून जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी आज (दि.10 जुलै) सावली आणि पोंभुर्णा तालुक्यातील पूरग्रस्त भागाला भेट देऊन बाधित क्षेत्राची पाहणी केली.
यावेळी जिल्हाधिका-यांनी सावली तहसील कार्यालयात तालुका आपत्ती व्यवस्थापन समितीची बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, आपत्तीला तात्काळ प्रतिसाद व आपत्तीनंतर पूर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना कराव्यात. सर्व अधिकाऱ्यांनी अलर्ट मोडवर राहून काम करावे. आपात्कालीन परिस्थितीत नागरिकांना राहण्याच्या सोयीकरिता गावातील शासकीय, निमशासकीय असलेल्या इमारती तसेच शाळा/ महाविद्यालये येथे आश्रय देण्याकरीता चांगली व्यवस्था करावी. पूरबाधित गावात धान्य आणि किराणाची कमतरता पडणार नाही, याबाबत दक्ष राहावे.
पूर परिस्थितीत रस्ते बंद असल्यामुळे इतर ठिकाणांवरून तालुक्याच्या ठिकाणी शाळा, महाविदयालमध्ये येणा-या विद्यार्थ्यांना शाळेत न- येण्याबाबत मुख्यध्यापक/ प्राचार्य यांना सुचना द्याव्यात. तसेच बाधित गावात अधिकारी/ कर्मचा-यांची नियंत्रण अधिकारी म्हणून नेमणूक करावी. रस्त्यांवरील खड्या बाबत सार्वजनिक बांधकाम विभागाला सुद्धा त्यांनी सुचना दिल्या.
पुढे जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, पूर परिस्थिती दरम्यान शेती पीक, मनुष्यहानी, पशुहानी, घर, गोठा व वीज पडून झालेल्या नुकसानीचे तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिका-यांनी त्वरित पंचनामे करावे. तसेच जे पुल पाण्याखाली गेले आहेत, त्याठिकाणी पोलिस विभागाने तात्काळ बॅरीकेट लावावे व पोलिस कर्मचा-याची नेमणुक करून जिवीतहानी होणार नाही, याबाबत दक्षता घेण्यात यावी. पूर परिस्थितीत आपदा मित्र येथील कर्मचा-यांनी जिवीतहानी टाळण्याकरिता 24 तास सतर्क राहण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा यांनी सावली तालुक्यातील जिबगाव-सिर्सी- साखरी हरांबा व व्याहाड बुज- वैनगंगा नदी मार्गाची व पूर परिस्थिती बाधीत क्षेत्राची पाहाणी केली. तसेच जिबगांव येथील ग्रामस्थ, सरपंच यांच्याशी संवाद सादला. पाहणीदरम्यान उपविभाग अधिकारी अजय चरडे, तहसीलदार प्रांजली चिरडे, गटविकास अधिकारी संजय नैताम, ठाणेदार श्री. पुल्लरवार, वैद्यकीय अधिकारी श्री. चौधरी, मुख्याधिकारी श्री. डोये यांच्यासह मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक आदी उपस्थित होते.
पोंभुर्णा तालुक्यात पूरग्रस्त भागाला भेट :
वैनगंगा नदीच्या पाण्याच्या वाढत्या पातळीमुळे निर्माण झालेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी टोक गावास भेट दिली. या दौऱ्यात त्यांनी गावाची व आसपासच्या परिसराची पाहणी केली. यावेळी त्यांनी घाटकुळ दिशेने जाणाऱ्या पुलाचे निरीक्षण केले. सदर पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्यामुळे रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. दौऱ्यादरम्यान त्यांनी ग्रामस्थांशी संवाद साधला. ग्रामस्थांनी कापूस व काही प्रमाणात सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे निदर्शनास आणून दिले. याची गंभीर दखल घेत जिल्हाधिका-यांनी तात्काळ शेतीच्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश प्रशासनास दिले.
टोक गाव वैनगंगा नदीच्या पुरामुळे पूर्णतः पाण्याने वेढले गेले असून पाणीपातळी आणखी वाढली तर गावात येणारा एकमेव रस्ताही बंद होण्याची शक्यता आहे. ही स्थिती लक्षात घेता प्रशासनाने पूर्वतयारी म्हणून कालच गावातील गरोदर माता यांना पोंभुर्णा ग्रामीण रुग्णालयात हलवले होते. तसेच संपूर्ण गावावर प्रशासनाने रात्रीभर लक्ष ठेवून आवश्यक उपाययोजना राबवल्या.