चंद्रपूर:- 70-राजूरा विधानसभा मतदारसंघात कमी कालावधीत मोठ्या संख्येने ऑनलाईन पध्दतीने प्राप्त झालेल्या अर्जासंदर्भात राजुरा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार नोंदणी अधिका-यांनी कोणत्याही तक्रारीची वाट न पाहता तात्काळ पाऊले उचलली. अर्जाच्या पडताळणी दरम्यान निदर्शनास आलेल्या बाबींच्या अनुषंगाने स्वयंस्फूर्तीने, कोणत्याही तक्रारीची वाट न पाहता नियमानुसार ठोस कार्यवाही केली आहे. राजूरा विधानसभा मतदार संघांतर्गत प्राप्त एकूण 6861 अर्ज हे वेळीच नाकारण्यात आल्याने मतदार यादीमध्ये या अर्जाचा समावेश झालेला नाही. सतर्कतेने केलेल्या कार्यवाहीमुळे 70-राजूरा विधानसभा मतदार संघांतर्गत बोगस मतदार नोंदणी टाळण्यात आली, असे स्पष्टीकरण राजुरा विधानसभा मतदारसंघाचे मतदार नोंदणी अधिकारी रविंद्र माने यांनी दिले.
भारत निवडणूक आयोगाकडून 06 ऑगस्ट ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीत 1 जानेवारी 2024 या अर्हता दिनांकावर छायाचित्र मतदार यादीचा दुसरा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम राविण्यात आला. सदर पुनरिक्षण कार्यक्रमाच्या वेळापत्रकानुसार राजुरा विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रावर छायाचित्र मतदार यादीस 06 ऑगस्ट 2024 रोजी प्रारूप आणि दिनांक 30 ऑगस्ट 2024 रोजी अंतीम प्रसिध्दी देण्यात आली. दिनांक 01 सप्टेंबर 2024 पासून निरंतर मतदार नोंदणी संबंधाने अर्ज निकाली काढण्याची कार्यवाही करण्यात आली.
निरंतर पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत 70 - राजूरा विधानसभा मतदार संघामध्ये 01 ते 17 ऑक्टोबर 2024 या कालावधीमध्ये नव्याने मतदार नोंदणी संदर्भात 7592 अर्ज प्राप्त झाले. सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, राजूरा यांनी सदर अर्जाची मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्यामार्फत चौकशी केली. चौकशीअंती एकूण 6861 अर्जामधील अर्जदार, संबंधित यादीवरील पत्यावर नसणे /अर्जदार अस्तित्वात नसणे अर्जदारांचे फोटो व पुरावे नसणे इत्यादी कारणावरून उपरोक्त अर्ज, रितसर नामंजूर करण्यासाठी परवानगी मिळण्याकरिता जिल्हा कार्यालयास 17 ऑक्टोबर 2024 रोजी प्रस्ताव सादर केला.
सहा. मतदार नोंदणी अधिकारी तथा तहसीलदार, राजूरा यांच्याकडून प्रस्तावित केलेली बाब गंभीर स्वरूपाची असल्याने जिल्हा निवडणूक अधिकारी कार्यालयाकडून दखल घेण्यात आली. तसेच मतदार नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, राजूरा यांना, त्यांच्या विधानसभा मतदार क्षेत्रांतर्गत प्राप्त झालेल्या सर्व अर्जांची बारकाईने तपासणी करावी. या अर्जांची सखोल चौकशी करून संबंधितांविरूध्द लोकप्रतिनिधित्व अधिनियम, 1950 आणि माहिती तंत्रज्ञान कायदा, 2000 च्या तरतूदीनुसार फौजदारी कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. दिलेल्या निर्देशाप्रमाणे मतदार नोंदणी अधिकारी यांनी केलेल्या चौकशीमध्ये 70 –राजूरा विधानसभा मतदार संघांतर्गत एकूण 6861 ऑनलाईन अर्जामध्ये त्रुटी आढळून आल्याने ते रितसर नाकारण्यात आलेत. तसेच सदर अर्जासंदर्भात पोलिस स्टेशन, राजूरा येथे अपराध क्र. 629/2024 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. त्यानुसार सदर गुन्ह्यामध्ये पोलिस विभागामार्फत चौकशी करण्यात येत आहे.
राजूरा विधानसभा मतदार संघात प्रशासनाच्या सतर्कतेमुळे 6861 अर्ज हे वेळीच नाकारण्यात आले. तसेच त्यांचा मतदार यादीमध्ये समावेश झाला नाही, असे राजुरा मतदार नोंदणी अधिकारी कार्यालयाने म्हटले आहे.