मुंबई:- राहुल गांधींचे मुद्दे म्हणजे हायड्रोजन बॉम्ब म्हणजे पाण्यात भिजलेला सुतळी बॉम्ब आहे जो पेटतही नाही आणि फुटतही नाही, अशी टीका भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शुक्रवार, १९ सप्टेंबर रोजी केली. राहुल गांधी यांनी केलेल्या राजुरा मतदारसंघातील मतचोरीच्या आरोपांनंतर केशव उपाध्ये आणि राजुऱ्याचे आ. देवराव भोंगळे यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली.
केशव उपाध्ये म्हणाले की, "राहुल गांधींनी लोकांमध्ये काम करणाऱ्या देवराव भोंगळे यांच्यावर आरोप केल्याने ते व्यथित होते. राहुल गांधी यांचा हायड्रोजन बॉम्ब म्हणजे भिजलेला सुतळी बॉम्ब आहे जो पेटतही नाही आणि फुटतही नाही. त्यांनी महाराष्ट्रातील राजूरा मतदारसंघाचे नाव घेऊन खोटे बोलले. राजूरा विधानसभेत ६ हजार ८०० मते वाढली असे ते म्हणाले. परंतू, प्रत्यक्षात राजूरा विधानसभेतून ६ हजार ८०० मते डिलीट करण्यात आली. ते इतकी ढळढळीत खोटी माहिती कुठून आणतात ते माहिती नाही," असे ते म्हणाले.
"ज्याला चोरी करायची आहे तो तक्रार कसा करेल? मागच्या वर्षी याच विधानसभेत चुकीच्या पद्धतीने मतदार नोंदणी सुरु असल्याचा आक्षेप तिथल्या भाजपच्या अध्यक्षांनी घेतला होता. त्याबाबत त्यांनी तक्रारही दाखल केली होती. राजुरा विधानसभेचे एक वैशिष्ट्य आहे. २०१४, २०१९ आणि २०२४ या तिन्ही निवडणुकांमध्ये निवडून आलेला उमेदवार हा २ ते अडीच हजार मतांनी निवडून येतो. याउलट यावेळी तिथे काँग्रेसची ९ हजार मते वाढली. भाजपला ७० हजार मते होती ती ७१ हजार झाली आणि काँग्रेस ६० हजार होती ती ६९ हजार झाली. यावरून राहुल गांधी हेच मतचोरीचे बादशाह असल्याचे पुन्हा दिसले. ते महाराष्ट्रातील मतदारांचा अपमान करत आहेत. त्यांनी याबद्दल जनतेची माफी मागावी. राहुल गांधींनी भोंगळे या एका ओबीसी आमदारावर आक्षेप घेतला असून त्यांनी पुन्हा एकदा आपला ओबीसी विरोधी चेहरा दाखवून दिला. याबद्दल काँग्रेसने माफी मागितली नाही तर जनता त्यांना येणाऱ्या निवडणुकीत धडा शिकवणार," असेही केशव उपाध्ये म्हणाले.
काँग्रेसच्या षडयंत्राचा निषेध - आ. देवराम भोंगळे
"राजुरा मतदारसंघात मतचोरी झाली नाही. राहुल गांधी यांनी काल खोटी माहिती देऊन राजुरा मतदारसंघाचे नाव बदनाम करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे त्यांनी राजुरा येथील जनतेची माफी मागितली पाहिजे. ते शासकीय संस्थांना बदनाम करत असून खोटे बोलून खळबळ माजवण्याचे काम करतात. काँग्रेसच्या या षडयंत्राचा आम्ही निषेध करतो. पुढच्या निवडणुकीत राहुल गांधी यांनी राजुरा मतदारसंघात निवडणूक लढवावी. भाजपचा सामान्य कार्यकर्त्यासुद्धा त्यांचा पराभव करेल," असे आव्हान आ. देवराव भोंगळे यांनी दिले.