Pombhurna News: अधिवक्ता ठेवण्याच्या विषयावर नगरपंचायतची विषेशसभा वादळी ठरली; अधिवक्त्यासाठी ना निविदा,ना नोटीस,ना जाहिरात

Bhairav Diwase

पोंभूर्णा:- नगरपंचायतच्या पॅनलवर अधिवक्ता ठेवण्याचा विषय पोंभूर्णा नगरपंचायतच्या विशेष सभेत प्रचंड गाजला असून आधीच एक अधिवक्ता पॅनलवर असतांना पुन्हा अधिवक्ता ठेवण्यासाठी नगरपंचायत कार्यालयाकडून ना निविदा काढण्यात आली, ना पेपर नोटीस, ना वृत्तपत्रात जाहिरात देण्यात आली. तरी एका विशिष्ट अधिवक्ताचे नाव टिपणीत ठेऊन त्याची शिफारस करण्याची बाब म्हणजे
शासनाच्या नियमांची पायमल्ली करुन व स्वतःच्या हितसंबंधीत व्यक्तींना नेमून शासकीय खजिन्यावर अतिरिक्त भुर्दंड बसविण्याचा प्रकार असल्याचा आरोप विरोधी गटनेते व नगरसेवकांनी केला आहे.आधीच नगरपंचायतच्या घनकचरा कंत्राट प्रक्रियेच्या गैरप्रकराबाबत विरोधी नगरसेवकांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली असल्याचे प्रकरण ताजे असतानाच अधिवक्ता नेमणूकीचा प्रकरण आता चर्चेचा विषय ठरला आहे.


पोंभूर्णा नगर पंचायतची विशेष सभा दि.२६ सप्टेंबरला आयोजीत करण्यात आली.सभेची नोटीस नगर पंचायत जा.क्र. नपंपों/विशेष सभा/२०२५/६१५ दि.२२/०९/२०२५ नुसार काढण्यात आली.नोटीसीमध्ये विषय क्र. ४ मध्ये नमुद केल्यानुसार अधिवक्ता महेश धात्रक यांच्या दि.२२ सप्टेंबरच्या विनंती अर्जानुसार विषय पत्रिकेत नमुद करण्यात आला आहे .ज्या दिवशी अर्ज आला त्याच दिवशी सभा ठरविल्या जाणे व सभा नोटीसीमध्ये सदरचा विषय समाविष्ठ करणे हा प्रकार मार्गदर्शक तत्वाचे पालन न करण्याचा असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते आशिष कावटवार यांनी केला आहे.


सभेमध्ये विरोधी नगरसेवकांनी खंडपीठ वकिलांची नियुक्तीचा विषय चर्चेत आला असता विरोधी गटनेते व इतर ४ नगरसेवकांनी एका विशिष्ट अधिवक्ताची गैरमार्गाने नियुक्ती करण्याचा विषय कसा मांडता येतो यावर आक्षेप नोंदविला असता सभाध्यक्षांनी अधिवक्ता नियुक्तीबाबत सभागृहाला मत नोंदवण्याचे सुचविले असता सत्ताधारी गटाकडून आठ नगरसेवकांनी ठरावाच्या बाजूने मत नोंदविले व विरोधी गटाकडून सहा नगरसेवकांनी आक्षेप नोंदविले व सत्ताधारी गटातील लक्ष्मण कोंडापे यांनी तटस्थ भूमिका बजावली.


चर्चेअंती सदर ठराव बहुमतांनी पारीत करण्यात आला. मात्र विरोधी पक्षनेते आशिष कावटवार,नगरसेवक गणेश वासलवार, अभिषेक बद्दलवार,अतुल वाकडे, नंदकिशोर बुरांडे,रामेश्वरी वासलवार,रिना ऊराडे यांनी आक्षेप नोंदविल्याने विशेष सभा प्रचंड गाजली.


नगर पंचायत पॅनलवर अधिवक्त्याची निवड करावयाची असल्यास कार्यालयाकडून निविदा, पेपर नोटीस किंवा वृत्तपत्रात जाहिरात देऊन निवड करावयाची असते. परंतु तसे न करता नगराध्यक्षा व मुख्याधिकारी यांनी मनमर्जीने व हितसंबंध जोपासून अधिवक्ता महेश धात्रक यांचा एकच अर्ज नगर पंचायतला प्राप्त करुन त्याच दिवशी तात्काळ विशेष सभा बोलाविणे व विषय सुचीत विषय ठेवून व टिपणीत स्पष्ट नावाचा उल्लेख करत सदर विषय सभेत ठेवून सभेची दिशाभुल करण्याचा प्रकार करण्यात आला आहे.हि बाब म्हणजे शासनाच्या नियमांची पायमल्ली करणारी आहे व सर्वसामान्य जनतेच्या कररुपी पैशाचा दुरुपयोग करणारी असल्याचा दावा करण्यात आला आहे.


गैरमार्गाने अधिवक्ता नियुक्तीबाबत आशिष कावटवार यांनी जिल्हाधिकारी व सह आयुक्त नगर विकास विभाग यांचेकडे तक्रार दाखल केले आहे.यात अधिवक्त्याची नेमणूक करणारा ठराव रद्द करण्यात यावा.व सर्वसामान्य जनतेकडून येणाऱ्या कर रूपी पैश्याची लुट करण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोषी अधिकारी,कर्मचारी व सभाध्यक्ष यांचेवर कार्यवाही करण्याची मागणी आशीष कावटवार यांनी केली आहे.