Theft News: हॉटेलात गेला अन् चार लाख रूपये गमावून बसला!

Bhairav Diwase
भद्रावती:- पैशाची बॅग हॉटेलमधील टेबलावर ठेवून नाश्ता करण्याआधी हात धुण्यास गेलेल्या प्रकल्पग्रस्ताची चार लाख रुपयांची बॅग अज्ञाताने लांबविल्याची धक्कादायक घटना सोमवारी दि. १५ सप्टेंबरला दुपारी अडीचच्या सुमारास शहरातील स्टेट बैंक ऑफ इंडिया परिसरातील संतकृपा हॉटेलमध्ये घडली.


बरांज मोकासा येथील आशिष यशवंत काळे (३१) हे प्रकल्पग्रस्त शेतकरी आहेत. त्यांची शेती बरांज खुल्या कोळसा खाणीसाठी त्यांना अधिग्रहित झाली. मोबदल्याची रक्कम मिळाली होती. काळे यांना शेती खरेदी करायची असल्याने सोमवारी दि. १५ सप्टेंबरला एचडीएफसी बँकेतून ४ लाख रुपये काढून बॅगमध्ये ठेवले.


उर्वरित ५ लाख काढण्यासाठी स्टेट बैंक ऑफ इंडिया शाखेत आले. मात्र, या शाखेतून रक्कम मिळण्यास अवधी होता. त्यामुळे ते बँक इमारतीच्या खाली असलेल्या संतकृपा हॉटेलमध्ये नाश्ता करण्यासाठी गेले. टेबलावर पैशाची बॅग ठेवली आणि ते हात धुण्यासाठी गेले. हीच संधी साधून अज्ञात चोरट्यांनी टेबलावरची बॅग लांबवली. टेबलजवळ आल्यानंतर बॅग गायब असल्याचे दिसताच त्यांनी लगेच भद्रावती पोलिस तक्रार नोंदवली. ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या मार्गदर्शनात चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.