Gondpipari News: गोंडपिपरीला वगळल्याने शेतकरी संतप्त; आमदार भोंगळे मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला!

Bhairav Diwase
चंद्रपूर:- सन २०२५ मधील अतिवृष्टी आणि पूरग्रस्त भागासाठी विशेष मदत पॅकेज जाहीर करण्यात आले. या पॅकेजमधून गोंडपिपरी तालुक्याला वगळण्यात आल्यामुळे स्थानिक शेतकरी बांधवांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. या पार्श्वभूमीवर, दि. १३ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे आमदार देवराव भोंगळे यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन तालुक्याला पुन्हा समावेश करण्याची मागणी करण्यात आली. Gondpipari 

सन २०२५ मध्ये अतिवृष्टी आणि पूर आपत्तीने बाधितांना मदत देण्यासाठी दि. ०९ ऑक्टोबर २०२५ रोजी काढलेल्या मूळ शासन निर्णयात गोंडपिपरी तालुक्याचा समावेश होता. मात्र, राज्य शासनाने दि. १० ऑक्टोबर २०२५ रोजी काढलेल्या सुधारित शासन निर्णयातून गोंडपिपरी तालुक्याला वगळण्यात आले. यामुळे तालुक्यातील हजारो शेतकरी मदतीपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आणि तीव्र असंतोष पसरला. या गंभीर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, दि. १३ ऑक्टोबर रोजी नागपूर येथे आयोजित एका संघटनात्मक बैठकीदरम्यान राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री मा. ना. श्री. देवेंद्रजी फडणवीस यांची आमदार देवराव भोंगळे यांनी भेट घेतली. Devendra Fadnvis 

निवेदनात स्पष्ट करण्यात आले की, गोंडपिपरी तालुका Gondpipari Talukaहा प्रामुख्याने शेतीबहुल आहे. विशेषतः, तालुक्याच्या चारही बाजूंनी वैनगंगा, वर्धा आणि अंधारी यांसारख्या प्रमुख नद्या वाहतात. या भौगोलिक रचनेमुळे, जून ते सप्टेंबर २०२५ या काळात तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी आणि पुरामुळे पीक तसेच मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानीची ही गंभीरता लक्षात घेऊन, सुधारित शासन निर्णयात तात्काळ दुरुस्ती करावी आणि गोंडपिपरी तालुक्याचा समावेश पुन्हा बाधित तालुक्यांच्या यादीत करावा, अशी कळकळीची मागणी करण्यात आली. Deorav bhongade 

या मागणीवर मुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून, या संदर्भात तात्काळ कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे. मुख्यमंत्र्यांच्या या आश्वासनामुळे येथील नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला असून, आता सुधारित शासन निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मुख्यमंत्री महोदय आपल्या आश्वासनाची पूर्तता कधी करतात आणि गोंडपिपरी तालुक्याला न्याय मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.