चंद्रपूर:- महानगरपालिकेअंतर्गत कार्यरत नाली सफाई कामगारांनी त्यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी महानगरपालिका कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केले होते. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामुळे शहरातील स्वच्छता व्यवस्थेवर परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली होती. यात आमदार किशोर जोरगेवार यांच्या मध्यस्थीने कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या असून, कामगारांनी आंदोलन मागे घेतले आहे.
वेतनवाढ, प्रलंबित वेतन तातडीने देणे, कायमस्वरूपी नियुक्तीची प्रक्रिया सुरू करणे, दिवाळी बोनस तसेच कामाच्या अटी सुधाराव्यात या प्रमुख मागण्या घेऊन कामगारांनी कष्टकरी जनसंघ संघटनेच्या नेतृत्वात आंदोलन सुरू केले होते. त्यामुळे दोन दिवस नाले सफाईचे काम बंद पडले होते.
सदर प्रकरणात आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतः हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्या सफाई कामगारांच्या प्रतिनिधींशी आणि महानगरपालिका प्रशासनाशी चर्चा केली. चर्चेदरम्यान सर्व मागण्यांबाबत सकारात्मक तोडगा काढण्यात आला. आमदार जोरगेवार यांनी प्रशासनाला तातडीने आवश्यक ती पावले उचलण्याचे निर्देश दिले. आजच कामगारांना दिवाळी बोनस देण्याचे मनपा प्रशासनाने मान्य केले आहे. या चर्चेनंतर कामगारांच्या सर्व मागण्या मान्य करण्यात आल्या असून, आमदार किशोर जोरगेवार यांनी आंदोलनस्थळी जाऊन सफाई कामगारांशी संवाद साधला. त्यांच्या आश्वासनानंतर कामगारांनी आनंदाने आंदोलन मागे घेतले.
या प्रसंगी मनपा अधिकारी, भारतीय कष्टकरी जनसंघाचे पदाधिकारी, कामगार नेते आणि कामगार उपस्थित होते. यावेळी आमदार जोरगेवार म्हणाले, “सफाई कामगार हे शहराच्या स्वच्छतेचे खरे रक्षक आहेत. त्यांच्या न्याय्य मागण्यांना न्याय मिळवून देणे ही आपली जबाबदारी आहे.” प्रशासनाने त्यांच्या सर्व मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात, असे आदेशही आमदार जोरगेवार यांनी दिले.