चंद्रपूर:- वर्धा नदीच्या तुराणा घाटावर पोहोण्यासाठी गेलेले दोघे वाहून गेले असून त्यांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. तर दोघांना नदी बाहेर काढून वाचविण्यात यश आले आहे. वाहून गेलेल्या मध्ये रुपेश विजेंद्र कुळसंघे (वय १३) रा. कर्मवीर वॉर्ड वरोरा, प्रणय विनोद भोयर (वय १५) रा. जिजामाता वॉर्ड वरोरा यांचा समावेश आहे. नदीपात्रातून वाहून गेलेल्यांचा अद्याप शोध लागला नाही. रात्र झाल्याने रेस्क्यू चमूने शोधमोहीम थांबविली आहे. सोमवार (ता. ३) पुन्हा शोधमोहीम राबविण्यात येणार आहे.
वरोरा शहरातील रुपेश विजेंद्र कुळसंघे, प्रणय विनोद भोयर, उमंग धर्मेंद्र आत्राम आणि कृष्णा चंद्रकांत कुईजडे हे चारही मित्र आज रविवार (ता. २) दुपारच्या सुमारास वर्धा नदीच्या तुराणा घाटावर सायकलने गेले. नदीपात्रात पोहण्यासाठी चौघेही उरतले. त्याचदरम्यान वर्धा नदीच्या घाटाच्या दिशेने एक महिला येत होती. त्यामुळे चारही मित्रांनी नदीच्या पात्रात लपण्याचा प्रयत्न केला. नदी पात्रात लपत असताना ते खोलगट भागात गेले. यात रुपेश विजेंद्र कुळसंगे, प्रणय विनोद भोयर, उमंग धर्मेंद्र आत्राम आणि कृष्णा चंद्रकांत कुईजडे हे चारही जण बुडाले. त्यांनी आरडाओरड सुरू केली. त्यांच्या आवाजाने जवळच जनावरे राखत असलेला गुराखी धावून आला. त्याने उमंग धर्मेंद्र आत्राम आणि कृष्णा चंद्रकांत कुईजडे या दोन मुलांना नदीतून यशस्वीरित्या पाण्याबाहेर काढले.
मात्र, रुपेश आणि प्रणय ही दोन मुले खोल पाण्यात वाहून गेली. गुराख्याने या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी या घटनेची माहिती मृताच्या कुटुंबीयांना दिली. त्यांचे कुटुंबीय घटनास्थळी आले. घटनेची माहिती मिळताच चंद्रपूर येथील पोलिस रेस्क्यू चमू घटनास्थळी दाखल झाली. त्यांनी नदी पात्रातून वाहून गेलेल्या मुलांचा शोध घेण्याचे काम सुरू केले. मात्र, अंधार पडल्याने ही मोहीम थांबविण्यात आली आहे. वाहून गेलेल्या दोघांचा मृत्यू झाला असावा असा संशय व्यक्त केला आहे. या घटनेने वरोऱ्यात शोककळा पसरली आहे.
वर्धा नदीच्या पात्रात प्रणय विनोद भोयर वाहून गेला. त्याचा मृतदेह अद्याप सापडला नाही. प्रणय अकरा महिन्यांचा असताना त्याच्या आईचे निधन झाले होते. त्याचे वडील विनोद भोयर यांनी त्याचे पालनपोषण केले होते. आधी पत्नी आणि आता मुलाचा दुर्दैवी अंत झाल्याने वडील विनोद भोयर एकाकी पडले आहेत.


