पोंभुर्णा:- गेल्या काही दिवसांपासून पोंभुर्णा तालुक्यात मुसळधार आणि अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला असून या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील बहुतेक गावांमध्ये शेतातील धान, कापूस आणि सोयाबीन पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची कंबर मोडली आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग प्रचंड संकटात सापडला असून शासनाने तातडीने मदत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने तहसीलदार यांना निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष विजय नामदेव दुर्गे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसील कार्यालयात भेट देऊन हे निवेदन सादर केले. निवेदनात म्हटले आहे की, “सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतातील पिके पूर्णपणे नष्ट झाली आहेत. काही भागात धानाची कापणी सुरू असताना झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे श्रम पाण्यात गेले आहेत. अनेक ठिकाणी पाण्याचा लोंढा शेतात साचल्याने पिकांची मुळे सडून गेली आहेत. परिणामी शेतकऱ्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.”
 “शेतकऱ्यांनी यावर्षी खत, बियाणे, मजुरी, औषधे आणि सिंचनावर मोठा खर्च केला. आता पिक नष्ट झाल्याने त्यांच्या पुढे कर्जफेड, घरखर्च आणि मुलांच्या शिक्षणाचा प्रचंड ताण आला आहे. आर्थिक संकटामुळे अनेक शेतकरी मानसिक तणावाखाली आहेत. त्यामुळे शासनाने तत्काळ मदतीची घोषणा करणे आवश्यक आहे.”
या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीने शासनाकडे काही ठोस मागण्या केल्या आहेत —
1️⃣ प्रभावित शेतकऱ्यांच्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्यात यावेत.
2️⃣ प्रत्येक शेतकऱ्याला झालेल्या नुकसानीनुसार प्रति एकर नुकसानभरपाई जाहीर करण्यात यावी.
3️⃣ पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांचे दावे लवकरात लवकर निकाली काढावेत.
4️⃣ शेतकऱ्यांच्या चालू कर्जाची वसुली काही काळासाठी थांबवावी आणि कर्जमाफी जाहीर करावी.
5️⃣ आर्थिकदृष्ट्या दुर्बल व अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी विशेष मदत निधी मंजूर करावा.
6️⃣ तलाठी, कृषि अधिकारी आणि पंचायत समितीमार्फत सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांची यादी तयार करून ती तहसील कार्यालयाकडे सादर करण्यात यावी.
वंचित बहुजन आघाडीने आपल्या निवेदनात असेही नमूद केले की, पोंभुर्णा तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी धानपिकावर अवलंबून आहेत. हे पीकच जर पूर्णपणे नष्ट झाले, तर शेतकऱ्यांच्या जगण्याची लढाईच कठीण होईल. त्यामुळे शासनाने मानवी दृष्टिकोनातून या गंभीर संकटाची तात्काळ दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
या निवेदनावेळी आघाडीचे तालुका अध्यक्ष विजय दुर्गे, जिल्हा उपाध्यक्ष शामकुमार गेडाम, प्रकाश तावाडे, अविनाश वाळके, राजु खोब्रागडे,महेंद्र उराडे, रविंद्र तेलसे,आशा झाडे,देवस्वामी भडके,भाऊजी वाळके,गुरुदास निमसरकार,राजेंद्र वाळके, रविंद्र भडके,रोशन रामटेके, समर्थ चुनारकर,नरेंद्र उराडे,फुलचंद इटकलवार, तेजराज उराडे, धनराज उराडे,पदाधिकारी, कार्यकर्ते आणि स्थानिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. तहसीलदारांनी निवेदन स्वीकारून त्यावर सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले आहे.
शेतकऱ्यांचे दु:ख ओळखून प्रशासनाने त्वरीत पंचनामे करून मदत मिळावी, अशी अपेक्षा शेतकरी वर्ग व्यक्त करीत आहे.


