वनविभागाकडून शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवले!
जिवती:- चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तालुक्यातील संगणापूरसह अनेक सीमावर्ती गावांमध्ये तेलंगणा प्रशासनाने दडपशाही सुरू केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तेलंगणा वनविभाग आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने कोणतीही पूर्वसूचना न देता, थेट शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांवर ट्रॅक्टर फिरवून लाखोंचे नुकसान केले आहे. या एकतर्फी कारवाईमुळे सीमाभागातील मराठी शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
गेल्या अनेक दशकांपासून ज्या जमिनीवर स्थानिक शेतकरी आपला घाम गाळून शेती करत आहेत, त्याच जमिनीवर अचानक तेलंगणा वनविभागाचे पथक दाखल झाले. कोणतीही नोटीस नाही, कोणतीही पूर्वसूचना नाही! थेट उभ्या पिकांवर ट्रॅक्टर चालवून शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट मातीत मिळवण्यात आले.
वृक्षलागवडीचे कारण पुढे करत तेलंगणा प्रशासनाने ही कारवाई केल्याचा दावा केला जात आहे. मात्र, ऐन पेरणीच्या आणि पिके वर येण्याच्या दिवसांत झालेल्या या कारवाईमुळे संगणापूर, हिरापूर (खुर्द), कोलांडी, डोंगरगाव आणि गोंदापूर परिसरातील शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाले आहेत.
विशेष म्हणजे, गेल्या काही महिन्यांपासून जिवती तालुक्यातील वादग्रस्त १४ ते १५ गावांमध्ये दोन्ही राज्यांकडून समांतर जनगणना आणि सीमा निश्चितीच्या हालचाली सुरू असतानाच हा प्रकार घडला आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी आणि महाराष्ट्र सरकारने यावर तत्काळ ठोस पावले उचलावीत आणि नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
खरं तर, हा केवळ पिकांचे नुकसान करण्याचा विषय नसून महाराष्ट्राच्या सीमावर्ती भागातील हक्कांवर गदा आणण्याचा प्रकार आहे, अशी भावना आता स्थानिक व्यक्त करत आहेत. या तणावाच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्र सरकार तेलंगणा प्रशासनाला काय चोख प्रत्युत्तर देते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
आम्ही पिढ्यानपिढ्या इथे शेती करतोय. आमची पिके छान आली होती. पण तेलंगणाचे पोलीस आणि वनविभागाचे लोक आले आणि त्यांनी आमच्या डोळ्यांदेखत पिकांवर ट्रॅक्टर फिरवला. आमचे मोठे नुकसान झाले आहे, आम्ही आता जगायचे कसे? आम्हाला न्याय मिळाला पाहिजे!
स्थानिक शेतकरी
जिवती तालुका

