चंद्रपूर:- चंद्रपूरकरांनो, आपल्या पोटच्या मुलांबद्दल तुमचे अती कौतुक किंवा सोयीसाठी घेतलेला निर्णय त्यांच्या जीवावर बेतू शकतो! जर तुम्ही तुमच्या अल्पवयीन मुलांच्या हातात कौतुकाने किंवा सोयीसाठी दुचाकी सोपवत असाल, तर चंद्रपूर पोलिसांची ही मोठी बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. तुमच्या याच एका चुकीमुळे तुमच्या मुलाचा जीव तर धोक्यात येऊ शकतोच, पण थेट तुम्हाला कोर्ट-कचेरीची पायरी चढावी लागू शकते!
रस्त्यांवरील वाढते भीषण अपघात रोखण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी आता थेट मैदानात उतरून धडक मोहीम हाती घेतली आहे. चंद्रपूर वाहतूक शाखेच्या कार्यालयात एक वेगळंच चित्र पाहायला मिळालं. स्वतः पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांनी थेट पोलीस ठाण्यात उपस्थित राहून, रंगेहाथ पकडलेल्या तब्बल 65 अल्पवयीन मुलांच्या पालकांची जाहीर 'शाळा' घेतली! "अल्पवयीन मुलांच्या हातात वाहन देणे म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळण्यासारखे आहे!" अशा कडक शब्दांत पोलीस अधीक्षकांनी उपस्थित पालकांना फैलावर घेत तंबी दिली.
या विशेष मोहिमेदरम्यान पकडलेल्या सर्व 65 वाहनांवर कडक दंडात्मक कारवाई करण्यात आली. यापुढे मुलांना चुकूनही गाडी देणार नाही, या अटीवर समजूत देऊन या पालकांना सोडण्यात आलं.
या कारवाईबाबत बोलताना पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की, ही मोहीम केवळ एका दिवसापुरती मर्यादित नाही. यापुढे चंद्रपूर शहर आणि संपूर्ण जिल्ह्यातील शाळा, कॉलेजेस आणि गर्दीच्या ठिकाणी अशीच कडक तपासणी केली जाईल. पालकांनी आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवावी, अन्यथा कडक कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल.
ही धडक कारवाई पोलीस अधीक्षक आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक ईश्वर काकडे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली, वाहतूक पोलीस निरीक्षक अमोल बारापात्रे आणि त्यांच्या विशेष पथकाने अत्यंत यशस्वीपणे पार पाडली.
त्यामुळे चंद्रपूरकरांनो, आपल्या मुलांचे भविष्य आणि सुरक्षा संपूर्णपणे आपल्या हातात आहे. अपघातांचे प्रमाण शून्यावर आणण्यासाठी अल्पवयीन मुलांना वाहने देणे आजच थांबवा, सुजाण नागरिक बना आणि पोलिसांच्या या मोहिमेला सहकार्य करा.

