Chandrapur News: चंद्रपुरात विद्यार्थ्यांचा 'आक्रोश सत्याग्रह'!

Bhairav Diwase
स्पर्धा परीक्षार्थींनी फुंकले प्रशासनाविरोधात रणशिंग!

चंद्रपूर:- स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संयमाचा बांध आता सुटला आहे. वारंवार होणारी पेपरफुटी, शासकीय नोकऱ्यांमधील वाढते कंत्राटीकरण आणि भरती प्रक्रियेतील प्रचंड दिरंगाई या विरोधात आज चंद्रपूर शहरात विद्यार्थ्यांचा प्रचंड 'आक्रोश सत्याग्रह' पाहायला मिळाला. स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारो विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडला आणि सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात प्रसिद्ध विद्यार्थी नेते आणि मार्गदर्शक नितेश कराळे गुरुजी देखील सहभागी झाले होते.

चंद्रपूरचा जिल्हाधिकारी कार्यालय परिसर आज विद्यार्थ्यांच्या घोषणांनी दणाणून गेला होता. एमपीएससी ऑनलाईन परीक्षा आणि त्यामधील गोंधळ घालणारी नॉर्मलायझेशन पद्धत रद्द करावी, NEET आणि TET सारख्या परीक्षांमधील पेपरफुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधारांवर कठोर कारवाई व्हावी, या प्रमुख मागण्यांसाठी हा 'आक्रोश सत्याग्रह' पुकारण्यात आला होता. याशिवाय महाज्योती (MAHAJYOTI), बार्टी (BARTI) आणि सारथी, टीआरटीआय (TRTI) सारख्या संस्थांमधील विद्यार्थ्यांच्या स्कॉलरशिप आणि निधीमधील कपात रद्द करण्याची मागणीही विद्यार्थ्यांनी लावून धरली.


विद्यार्थी वर्षानुवर्षे लायब्ररीमध्ये अभ्यास करतोय. पण जेव्हा परीक्षा होते तेव्हा पेपर फुटतो, किंवा कंत्राटी भरती करून आमच्या हक्काच्या जागा हिरावल्या जातात. सरकारने कंत्राटीकरण तात्काळ बंद करावे आणि नियमित पदभरती सुरू करावी, अन्यथा हा आक्रोश मुंबईपर्यंत पोहोचेल. असा इशारा यावेळी देण्यात आला.


या आंदोलनात प्रमुख मार्गदर्शक नितेश कराळे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणांवर सडकून टीका केली. स्पर्धा परीक्षांची व्यवस्था पारदर्शक असायला हवी, पण सरकार विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळत असल्याचा आरोप त्यांनी केला. सरळसेवा भरतीप्रमाणे पोलीस शिपाई भरतीमध्येही ५ वर्षांची वयोमर्यादा वाढवून मिळावी, अशी आग्रही मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनाचे मुख्य संयोजक डॉ. अनिल डहाके यांच्या नेतृत्वात विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर केले. मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा समन्वय समितीने दिला आहे.