Chandrapur News: चंद्रपुरात गणेशोत्सवात डीजे वाजणार, पण मर्यादित आवाजात!

Bhairav Diwase
अटी व शर्तींसह वाजवण्यास मंजुरी! आमदार जोरगेवार यांची मध्यस्थी
चंद्रपूर:- यंदाच्या गणेशोत्सवात विसर्जन मिरवणुकीदरम्यान डीजेवर घालण्यात आलेल्या बंदीबाबत आमदार किशोर जोरगेवार यांनी यशस्वी मध्यस्थी केली आहे. गणेश मंडळे, गणेशभक्त आणि डीजे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह आमदार जोरगेवार यांनी जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन या प्रश्नावर सकारात्मक तोडगा काढला. त्यामुळे यंदा चंद्रपूर जिल्ह्यात अटी व शर्तींसह मर्यादित आवाजात डीजे वाजविण्यास प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे.


जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांनी सुरुवातीला ध्वनीप्रदूषण रोखण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी डीजेवर पूर्ण बंदीचे आदेश दिले होते. या निर्णयामुळे डीजे व्यावसायिक आणि गणेशभक्तांमध्ये नाराजी पसरली होती. या पार्श्वभूमीवर सर्वांनी आमदार किशोर जोरगेवार यांची भेट घेऊन बंदीच्या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची मागणी केली.


धार्मिक भावना आणि नियमांचा समतोल
आमदार जोरगेवार यांनी बुधवारी गणेशभक्त आणि डीजे असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांसह जिल्हा पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी यांची भेट घेतली. या सविस्तर चर्चेत धार्मिक भावना, उत्सवाचे पारंपरिक स्वरूप, नागरिकांची गैरसोय आणि कायदा-सुव्यवस्था या सर्व बाबींवर मंथन झाले. त्यानंतर नागरिकांना त्रास होणार नाही अशा पद्धतीने, मोठे साऊंड सिस्टिम न लावता मर्यादित आवाजात डीजे वाजविण्यास परवानगी देण्यात आली.
स्वयंघोषणापत्र देणे बंधनकारक
या सवलतीसाठी संबंधित गणेश मंडळ किंवा डीजे मालकांनी पोलीस प्रशासनाकडे स्वयंघोषणापत्र सादर करणे बंधनकारक राहील. शासनाने निर्धारित केलेल्या ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे पालन केले जाईल, तसेच सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्याची संपूर्ण जबाबदारी मंडळांची राहील, असे पोलीस अधीक्षकांनी स्पष्ट केले.


या बैठकीला भाजपचे माजी महानगराध्यक्ष सुभाष कासनगोट्टूवार, बलराम डोडाणी, तुषार सोम, गणेश मंडळातील दर्शन बुरडकर, ईश्वर वाघमारे, हर्षल कानमपल्लीवार, डीजे असोसिएशनचे उमेश लांडगे, देवाशीष गांगुली, निशांत निखार, प्रज्वल चोपावर आदी उपस्थित होते.


गणेशोत्सव हा श्रद्धा आणि उत्साहाचा सण आहे. तो शांततेत व नियमांचे पालन करून साजरा होणे आवश्यक आहे. गणेशभक्तांच्या धार्मिक भावना जपत सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही, असा समतोल साधून हा निर्णय घेण्यात आला आहे.
आमदार किशोर जोरगेवार