Murder News: दुपारी वाळू भरण्याचे टाळले, रात्री एकत्र मद्यप्राशन केले; अन् काही तासांतच संपवले आयुष्य!

Bhairav Diwase

गडचिरोली:- धानोरा तालुक्यातील राजोली येथे वाळू वाहतुकीसाठी आलेल्या टिप्परच्या चालकाने मद्यप्राशनानंतर झालेल्या वादातून क्लिनरची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून केल्यानंतर मृतदेह शेतातील झाडाझुडपांत टाकून चालक घटनास्थळावरून पसार झाला. बुधवारी (१५ जुलै) सकाळी शेतकऱ्यांना मृतदेह आढळल्यानंतर हा प्रकार समोर आला. संशयित चालकाचा पोलिसांकडून शोध सुरू आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, मार्कस सुनील मेश्राम (वय १८, रा. तिरखुडा, ता. उमरेड, जि. नागपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. तर विशाल प्रदीप महाकाळकर (१८, रा. नागपूर) असे संशयित आरोपीचे नाव आहे. बुधवारी सकाळी सुमारे ११ वाजता राजोली येथील वाळू साठा परिसरापासून सुमारे ३०० मीटर अंतरावरील शेतातील झुडपांमध्ये एका तरुणाचा मृतदेह आढळल्याची माहिती स्थानिक शेतकऱ्यांनी पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस निरीक्षक प्रशांत जंगले यांनी सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला.



एकत्र मद्यप्राशनानंतर वाद

प्राथमिक तपासानुसार, एमएच-४०-सीटी-५१०० क्रमांकाचा टिप्पर १४ जुलै रोजी दुपारी वाळू भरण्यासाठी राजोली येथे आला होता. तेथील कर्मचाऱ्यांनी विचारणा केली असता चालकाने सायंकाळी वाळू भरू, असे सांगून टिप्पर बाजूला उभा केला. रात्री चालक व क्लिनर यांनी एकत्र मद्यप्राशन केले. त्यानंतर किरकोळ कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर विशाल महाकाळकर याने मार्कस मेश्राम याचा गळा आवळून खून केल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यानंतर मृतदेह झाडाझुडपांत टाकून चालक पसार झाला.


शोधासाठी विशेष पथके

या प्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयिताच्या शोधासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत. सायंकाळपर्यंत त्याचा माग काढण्यात पोलिसांना यश आले नव्हते. दरम्यान, मृत मार्कस याच्या डाेक्यावरील पितृछत्र हरवलेले आहे. घरात आई व बहीण आहे. तिघेही राेजंदारीने काम करून कुटुंबाचा गाडा हाकत. मात्र, मार्कस याच्या मृत्यूने आई व बहिणीचा एकमेव आधार हरवला आहे. गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी लागू असतानाही चालक आणि क्लिनर यांनी मद्यप्राशन केल्याची माहिती समोर आल्याने दारूबंदीच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. खुनामागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी मद्य कुठून मिळाले, याचाही तपास पोलीस करीत आहेत.