Chandrapur News: शेतकऱ्यांचे शेती साहित्य व अवजारे चोरणाऱ्या टोळीचा पर्दाफाश!

Bhairav Diwase
९ लाख ५१ हजारांचा मुद्देमाल जप्त; एकाला अटक तीन आरोपी फरार
चंद्रपूर:- चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातून शेतकऱ्यांचे शेतीसाहित्य आणि महागडी अवजारे चोरी करणाऱ्या एका सराईत आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (LCB) पथकाने ताब्यात घेतले आहे. आरोपीकडून चोरीचे शेती साहित्य आणि गुन्ह्यात वापरलेली महिंद्रा बोलेरो गाडी, असा एकूण ९,५१,५००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, या कारवाईमुळे वरोरा, बल्लारपूर, गडचांदूर आणि राजुरा परिसरातील ५ मोठे गुन्हे उघडकीस आले आहेत.


मिळालेल्या माहितीनुसार, दि. १४ जुलै २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या पथकाने कोसारा ते पडोली रोडवर संशयास्पद हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी नाकाबंदी केली होती. यादरम्यान शिवराज चिनकन वेलपुरी (वय ३९ वर्षे, रा. राजीव गांधी नगर, आझाद चौक, चंद्रपूर) याला पथकाने ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने आपल्या साथीदारांच्या मदतीने जिल्ह्यातील विविध भागात शेती साहित्य चोरी केल्याची कबुली दिली.


५ गुन्हे उघडकीस, बोलेरो गाडी जप्त
पोलिसांनी आरोपीकडून २,५१,५०० रुपये किमतीचे शेती साहित्य व अवजारे आणि चोरीच्या वाहतुकीसाठी वापरलेली ७,००,००० रुपये किमतीची महिंद्रा बोलेरो गाडी (क्र. MH-34-CQ-1310) असा एकूण ९ लाख ५१ हजार ५०० रुपयांचा माल जप्त केला आहे. या अटकेमुळे वरोरा (अ.क्र. ८०३/२६), बल्लारपूर (अ.क्र. ६८८/२६), गडचांदूर (अ.क्र. ३४७/२६ व ३८६/२६) आणि राजुरा (अ.क्र. ६००/२६) पोलीस ठाण्यांतर्गत भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ३०३(२) अन्वये दाखल असलेले पाच गुन्हे उघडकीस आले आहेत.


तीन आरोपी अद्याप फरार
या गुन्ह्यात मुख्य आरोपी शिवराज वेलपुरी याला अटक करण्यात आली असली, तरी त्याचे इतर तीन साथीदार आकाश हरिदास बेले (रा. भद्रावती), राजू वीरशपा स्वामीशेट्टी (रा. गडचांदूर) आणि रवी दगडुजी गदाई (रा. इंदिरानगर, चंद्रपूर) हे सध्या फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत.


सदर धडक कारवाई स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूरच्या मार्गदर्शनात उपविभाग वरोरा व उपविभाग राजुरा येथील विशेष पोलीस पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पोलिसांच्या या कारवाईमुळे परिसरातील शेतकरी वर्गाने समाधान व्यक्त केले आहे.