Chandrapur News: गॅस सिलिंडर चोरी प्रकरणाचा पर्दाफाश!

Bhairav Diwase
चंद्रपूर:-
पडोली पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या एमआयडीसी खुटाळा परिसरातून ३४२ नग गॅस सिलिंडरसह ट्रक चोरीला गेल्याच्या खळबळजनक प्रकरणाचा चंद्रपूर पोलिसांनी अवघ्या काही दिवसांत यशस्वी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा (LCB) आणि पडोली पोलिसांनी संयुक्त रित्या कारवाई करत या गुन्ह्यातील ३ आरोपींना निष्पन्न केले असून, त्यांच्याकडून लाखो रुपयांचा मुद्देमाल आणि रोख रक्कम जप्त केली आहे.


गॅस सिलिंडर ट्रान्सपोर्टिंगचा व्यवसाय करणारे फिर्यादी वैभव विनोद खांडरे (वय ४२ वर्षे, रा. समाधी वार्ड, जेल रोड, चंद्रपूर) यांनी याप्रकरणी तक्रार दाखल केली होती. दि. १२ जुलै २०२६ रोजी एमआयडीसी खुटाळा येथील गॅस बॉटलींग प्लांटसमोरील रोडवरून अज्ञात चोरांनी त्यांचा ३३२ नग घरगुती सिलिंडर, १० नग कमर्शियल सिलिंडरने भरलेला निळ्या रंगाचा अशोक लेलंड ट्रक (क्र. MH 34 BG 1600) चोरून नेला होता. या चोरी गेलेल्या मालाची एकूण किंमत अंदाजे २१,१४,०००/- रुपये होती. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पडोली पोलीस स्टेशनमध्ये या गुन्ह्याची नोंद करून तपास युद्धपातळीवर सुरू करण्यात आला होता.


गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन चंद्रपूरचे पोलीस अधीक्षक आयुष नोपानी आणि अपर पोलीस अधीक्षक ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी शोधमोहीम राबवून या गुन्ह्यातील तीन मुख्य आरोपींचा थेट सहभाग निष्पन्न केला.


निष्पन्न झालेल्या आरोपींची नावे:
१) राजेंद्र रामचंद्र काळे (वय ३२ वर्षे, रा. वांढरी फाटा, पडोली, चंद्रपूर)
२) कुणाल सुभाष घुरुडे (वय २७ वर्षे, रा. म्हाडा कॉलनी, दातळा, चंद्रपूर)
३) मोहीत पोतदार (रा. मुलचेरा, जिल्हा गडचिरोली)


आरोपींची सखोल चौकशी केल्यानंतर त्यांनी चोरलेला बहुतांश मुद्देमाल आणि सिलिंडर बेकायदेशीररित्या विकून जमा केलेली रोकड पोलिसांनी जप्त केली.

जप्त करण्यात आलेल्या मालाचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
८२ नग: गॅसने पूर्ण भरलेले घरगुती सिलिंडर (१४.२ किलो, HP कंपनी)

२५० नग: रिकामे घरगुती सिलिंडर (१४.२ किलो, HP कंपनी)

१० नग: गॅसने पूर्ण भरलेले कमर्शियल सिलिंडर (१९ किलो, HP कंपनी)

२,४७,०००/- रुपये: चोरीचे सिलिंडर बेकायदेशीररित्या विकून जमा केलेली रोख रक्कम



ही धडाकेबाज कामगिरी पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या थेट नेतृत्वात सपोनि. योगेश विसे, सपोनि. दीपक कंकरेद्वार, पोउनि. विनोद भुरले, पोउनि. सुनील गौरकार, पोउनि. देवानंद केकान (पो.स्टे. पडोली), पोहवा सुभाष गोहोकार, सतीश अवथरे, रजनिकांत पुठ्ठावार, दीपक डोंगरे, इमान खान, शरद कुडे, पोअं हिरालाल गुप्ता, संदीप कांबडी, किशोर वाकाटे आणि शशांक बदामवार यांनी केली. या यशस्वी कारवाईबद्दल पोलीस पथकाचे सर्वत्र कौतुक होत आहे.