चंद्रपूर:- देश आणि राज्यातील लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणाऱ्या अन्यायकारक परीक्षा पद्धती, पेपरफुटी आणि शासकीय नोकऱ्यांच्या कंत्राटीकरणाविरोधात आता विद्यार्थी रस्त्यावर उतरणार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात आगामी १४ जुलै रोजी एक भव्य 'विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह' पुकारण्यात आला असून, स्पर्धा परीक्षा विद्यार्थी समन्वय समितीने या लढ्यासाठी कंबर कसली आहे. पत्रकार परिषदेत या आंदोलनाची अधिकृत घोषणा करण्यात आली.
स्पर्धा परीक्षांमधील सातत्याने होणारे गैरव्यवहार, NEET आणि TET सारख्या परीक्षांमधील पेपरफुटी, तसेच एमपीएससीच्या ऑनलाईन परीक्षा आणि क्लिष्ट 'नॉर्मलायझेशन' पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या अन्यायकारक निर्णयांचा थेट फटका कष्टकरी आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. याच अन्यायाला वाचा फोडण्यासाठी चंद्रपुरातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर येत्या १४ जुलै २०२६, मंगळवारी दुपारी १२:०० वाजता हा 'विद्यार्थी आक्रोश सत्याग्रह' होणार आहे.
विद्यार्थी समन्वय समितीने शासनासमोर प्रामुख्याने ५ मोठ्या मागण्या ठेवल्या आहेत:
1) MPSC ऑनलाईन परीक्षा आणि नॉर्मलायझेशन पद्धत तात्काळ रद्द करून सर्व परीक्षा केवळ ऑफलाइन OMR पद्धतीने घेण्यात याव्यात.
2) NEET आणि TET पेपरफुटीतील मुख्य आरोपींवर कठोर कारवाई व्हावी आणि शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा.
3) महाज्योती (MAHAJYOTI), बार्टी (BARTI) आणि टीआरटीआय (TRTI) या संस्थांच्या निधी व विद्यार्थी संख्येत कपात करणारा शासन निर्णय रद्द व्हावा.
4) महाराष्ट्रातील ३६ ही जिल्ह्यांमध्ये कनिष्ठ महाविद्यालयीन ओबीसी विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृहे तात्काळ सुरू व्हावीत.
5) शासकीय नोकऱ्यांमधील वाढते कंत्राटीकरण (Contracualization) कायमचे बंद व्हावे.
या संदर्भात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना निमंत्रकांनी सांगितले की, हा लढा केवळ विद्यार्थ्यांचा नाही, तर देशाच्या आणि राज्याच्या भविष्याचा आहे. जर विद्यार्थी वाचला तरच देश घडेल. त्यामुळे प्रत्येक सजग नागरिक, पालक आणि शिक्षकांनी या आंदोलनात सहभागी होणे गरजेचे आहे.
या पत्रकार परिषदेला नंदू नागरकर, अनिल डहाके, इंजि. जितेंद्र पिंपळशेंडे, दत्ता बारगीरे, मंगेश गौरकार, अविनाश आडे, अजहर सय्यद, अजय दुर्गे, देवा पाचभाई, गोविंद एकडे, रोशन भोयर आणि निखिल धोडरे या प्रमुख पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.

