चंद्रपूर:- चंद्रपुरात प्रशासनाचा ढिसाळ आणि निष्काळजी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. चंद्रपुरात पालिका प्रशासनाला जाग येण्यासाठी नेहमीच कुणाचा तरी बळी जावा लागतो का? असा संतप्त सवाल आता विचारला जात आहे.
चंद्रपूर शहरातील ताडोबा मार्गावरील तुकुम परिसरात एका भीषण अपघातात ५३ वर्षीय सायकलस्वार विनायक पराते यांचा बसखाली चिरडून जागीच मृत्यू झाला. आणि सर्वात संतापजनक बाब म्हणजे, या दुर्दैवी अपघातानंतर खडबडून जागे झालेल्या चंद्रपूर महानगरपालिकेने आज अपघात झालेल्या ठिकाणच्या फुटपाथवरील अतिक्रमण हटवण्यास घाईघाईने सुरुवात केली आहे. म्हणजेच काय, तर प्रशासनाला कारवाई करण्यासाठी आधी एखाद्या निष्पाप नागरिकाचा मृत्यू व्हावा लागतो.
चंद्रपूर शहरातील तुकुम परिसरातील रहिवासी असलेले विनायक पराते हे ५३ वर्षांचे गृहस्थ आपल्या सायकलने ताडोबा मार्गावरून जात होते. याच दरम्यान मागून येणाऱ्या एका बसने त्यांच्या सायकलला पाठीमागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की विनायक पराते हे थेट बसच्या चाकाखाली आले आणि चाकाखाली चिरडले गेल्याने त्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर संपूर्ण तुकुम परिसरात तीव्र शोककळा पसरली आहे.
या भीषण अपघाताचे मुख्य कारण रस्त्यावरील आणि मुख्यत्वे फुटपाथवरील वाढते अतिक्रमण असल्याचे समोर आले. रस्ता अरुंद झाल्याने आणि फुटपाथवर दुकानदारांनी ताबा मिळवल्यामुळे सायकलस्वार आणि पादचाऱ्यांना जीव मुठीत धरून रस्त्यावरून चालावे लागते. या अपघातानंतर मात्र चंद्रपूर महानगरपालिकेला अचानक जाग आली. घटनेचे गांभीर्य ओळखून पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने आज अपघात स्थळाच्या परिसरातील आणि ताडोबा मार्गावरील फुटपाथवरील अतिक्रमण युद्धपातळीवर हटवण्यास सुरुवात केली आहे. पण नागरिकांचा सवाल एकच आहे... ही तत्परता अपघात घडण्याआधी प्रशासनाने का दाखवली नाही?
निष्पाप विनायक पराते यांचा जीव तर गेला, पण त्यांच्या मृत्यूनंतर मनपाने सुरु केलेली ही कारवाई म्हणजे वरातीमागून घोडे नाचवण्यासारखाच प्रकार आहे. जर पालिकेने आधीच या फुटपाथवरील अतिक्रमणांवर हातोडा चालवला असता, तर कदाचित पराते यांचा जीव वाचला असता. आतातरी चंद्रपूर महानगरपालिका शहरातील इतरही मृत्यूचे सापळे बनलेल्या रस्त्यांवरील अतिक्रमण हटवणार की पुन्हा एखाद्या मोठ्या अपघाताची वाट पाहणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

