अविनाश पोईनकर,
बिबी, ता.कोरपना, जि.चंद्रपूर
मोब. ७३८५८६६०५९
(लेखक साहित्याचे अभ्यासक व ग्रामीण विकास चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)
येरे येरे पावसा, तुला देतो पैसा..
पैसा झाला खोटा, पाऊस आला मोठा..
या कवितांनी बालपण समृद्ध केलं. खरंतर अशी बोलगाणी विसरताच येत नाही. तप्त उन्हाळ्यात अंगाची काहिली झाली की पाऊस कधी येतो असं होतं. अंगातून निघणाऱ्या घामेजलेल्या धारा जमिनीवर ओघळतात. मातीतून उष्णतेची लाट येते. पावसासाठी जीव आतुरतो. चातक पक्ष्यासारखी अवस्था होते. माती आणि अवकाशाचं नातं हे जणू पती-पत्नीचं असावं. पाऊस हे त्यांना एकरूप करण्याचं माध्यम. ऋतुचक्र फारसे बदलत नाहीत. माणसासारखे तर मुळीच नाहीत. मृग नक्षत्राच्या धारा कोसळतात तसा मृदगंध दरवळतो. हा मृदगंध पावसा सारखा कित्येकांना हवाहवासा असतो. दूरवर पाऊस कोसळत असला तरी सुगंध थेट हृदयाला भिडतो. पावसाची सुरुवात अनेकांच्या आयुष्याची पर्वणी असते. जैवविविधतेचं, मानवी कल्याणाचं सार्थक असते. हाच पाऊस मनसोक्त बरसला अन् झळ सुरु झाली की वातावरणात जसा गारवा येतो तशाच अनेक झोपड्या गारठून पडतात. धावाधाव होते. कुणाचं घर कोसळतं, कुणाचं सामान डोळ्यांदेखत वाहून जाते. वेदनेचा आगडोंब डोळ्यात साठवता येत नाही. सगळीकडे एकच टाहो ऐकू येतो, पूर.. महापूर...
महापुराच्या गोष्टी वृत्तपत्राचे रकाने वाचतांना आणि दूरचित्रवाणीत दृश्य पाहण्यापुरते बरे असते. कारण ती आपत्ती आपण भोगत नसतो. आपण जागेवरच अनेकांगी तर्क-वितर्क लावतो. शासन-प्रशासनाने तत्काळ मदत केली पाहीजे, अशा कोरड्या घशाने बाता करतो. 'कित्येक वर्षानंतर आलेला मोठा महापूर' वगैरे नोंदी सोडतो. खरेतर प्रश्न पुराचा किंवा महापुराचा नाहीच. 'नैसर्गिक आपत्तीत मंडळ जबाबदार राहणार नाही' अशा सूचना देणारे आम्ही झटक्यात महापुराची जबाबदारी पुरात वाहून गेलेल्या होडी सारखी सोडतो. खरेतर प्रकल्पग्रस्तांसारखीच पूरग्रस्तांची व्यथा. दरवर्षी पाऊस येतो. आठवडा, महिनाभर बरसतो. जवळचे नदी, नाले तुडुंब भरतात. त्यावर असणारी धरणे फुगतात. अचानक धरणांचे पाणी सोडल्या जाते. बघता बघता नदीकाठावरील हजारो गावे पाण्याखाली येते. अख्खं घर पाण्याखाली जातं. कुळा मातीच्या भिंतीची माती विरघळते. अन्नधान्याचं पाणी होतं. जनावरांना मोकाट सोडून घराबाहेर निघून जावे लागते. कुणी वाहून जातात तर कुणाला बाहेर निघताच येत नाही. कधीही हेलिकॅप्टर न पाहणाऱ्या लोकांना बाहेर काढण्यासाठी हेलिकॉप्टर येतो. शेजारील गावात एखाद्या शाळेत तात्पुरती संरक्षणात्मक सोय केली जाते. महापुरात अडकलेल्या कुटुंबाच्या वाताहतीचा संघर्ष खरेच सोपा असतो ?
मला आठवते २००६ ची गोष्ट! पैनगंगेच्या तीरावर वसलेल्या मामाच्या गावाची. अचानक रिमझिम पाऊस कोसळत असतांना आंध्रप्रदेशात बांधलेल्या नदीवरील धरणाची पाण्याची पातळी वाढली. पाणी सोडले. कधीही पूर न बघितलेला गाव मात्र तीन दिवस पाण्यात तरंगताना पाहिला. हल्ली पूर, महापूर नैसर्गिक पेक्षा कृत्रिम प्रयोगामुळे होत असल्याचा खेद जास्त आहे. कोळसा खाणींमुळे नदीच्या शेजारी मोठे ढिगारे उभे झाले. पुढे तर चक्क नदीचा प्रवाह बदलवल्या गेला. आता थोडे पाणी आले तरी मातीच्या ढीगार्यामुळे पाणी पुढे न जाता थांबते. कृत्रिम पूर तयार होतो. मी तेव्हा जेमतेम सहावीत असेल. आमचंही हातावर पोट. आईने दोनेक किलो चिवडा केला. माझ्या गावापासून जवळपास बारा कि.मी अंतरावर असलेल्या मामाच्या गावा जवळ सायकलने पोहोचलो. शेजारील गावात गाववासियांना हलवलं होतं. गावातल्या लोकांचे हाल अनुभवून पुरता हेलावलो. कुणाची आयुष्यभर जमवलेली पुंजी वाहून गेली होती. बैल डोळ्यादेखत बुडाले होते. त्याच वेळेस गावातल्या कोंबड्यांवर ताव मारणारे लोकही बघितले होते. सगळं अस्वस्थ करणार होतं. शेतीची गोष्ट केली की पोटात पूर येवून गतप्राण व्हावे, अशीच अवस्था !
मागील वर्षी केरळ राज्यात जणू पावसाची त्सुनामी आली. भूकंपाने जसा उद्ध्वस्त व्हावा तसा पावसाने कित्येक परिसर उद्ध्वस्त केला. महाराष्ट्रातील सांगली, कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्राला देखील पावसाने झोडपले. याच दरम्यान कधीही पूर परिस्थिती उजेडात न आलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड परिसराकडे अनेकांचे लक्ष वेधले गेले. इथे चक्क दरवर्षी निदान पाच ते सातदा महापूर येतो. आदीम माडिया समाजातील येथील लोक खरेतर निसर्गपूजक. रस्ते नाही. फारशी विज नाही. नेटवर्कचा तर प्रश्नच नाही. कित्येक उन्हाळे-पावसाळे अंगावर झेलून आयुष्यात खंबीर उभे राहण्याची ताकद, येथील लोकांची अफाट श्रीमंती आहे. खरंच होता येतं आपल्याला इतकं श्रीमंत ?
कुठल्या बर्बादीचे स्वप्न
उशीखाली दडवून ठेवलेस
बघ!
उध्वस्ताच्या बाजारात
पावसानेही भाव ठरवलेय...
पाऊस... पूर... महापूर... ओसरल्यावर बहुदा हेच चित्र सर्वार्थाने उजेडात येते. कधीही न पोहोचणारे रंगबेरंगी महोदय सात्वनाला येतात. मदत जाहीर करण्याचे आश्वासने देतात. पुनर्वसन, सर्वेक्षणाच्या सूचना देतात. हल्ली अशा वेळी भाषणे टाळण्याचा मोह तरी निदान आवरता यायला हवा. उद्ध्वस्त घराची लाकडे जाळावी तसे कित्तेक लोक पूरग्रस्तांच्या वेदनांना बेहिशेबी जाळत असतील, हा विचारच करायला नको.
पूर असताना जितका विचार आपण करू शकत नाहीत, त्यापेक्षा कित्येक पटीने पूर ओरसल्यानंतर विचार येतो. 'पुढे काय ?' हा प्रश्न सातत्याने छेडण्यासाठी उभा असतो. हुंदक्याचा आपोआप पूर येतो. नदीकाठावर असणारी गावे अर्थात कृषिप्रधान असणारीच असते. यात सर्वाधिक नुकसान होतं, ते कास्तकाराचं. कास्तकारांना अस्मानी, सुल्तानी संकटे जशी सोडत नाहीत, तसा महापूर देखील सोडत नाही. डौलाने बहरणारी हिरवी पालवी पाण्याखाली पानझडीसह नेस्तनाबूत होवून बाहेर येते. नोकरदार वर्गांना महिनाभर काम करून वेतन मिळाले नाही तर ते आक्रोश करतात. इथे कास्तकारांची वर्षभर रोजीरोटी बुडाल्याने त्यांच्या जीवाच्या काहिलीचा आक्रोश आपल्याला समजता येईल ?
मान्य आहे, पूर परिस्थिती असताना अनेक सामाजिक संघटना तात्पुरता मदतीचा हात देतात. शासनाची तुटपुंजी मदत कधी कधी होते. पण वर्षभर कुटुंबाचं पोट असणाऱ्या जीवाची शारीरिक, आर्थिक, मानसिक नुकसान भरपाई खरंच करता येईल ? शेतकरी आत्महत्यांच्या वाढत्या आलेखाला नक्की जबाबदार कोण याचे नेमके उत्तर अजूनही सापडत नाही.
पूर ओरसल्यावर फक्त मातीलाच भेगा पडत नाही तर मनालाही पडतात. त्या भेगा फार लवकर बुजल्या जातील अशा नसतातच. कधी पूल वाहून जातो. रस्त्याच्या डांबराचा कधी पत्ता लागत नाही. मेहनतीने बांधलेली घरे जमीनदोस्त होतात. आधीच कर्जबाजारी, त्यात पुन्हा आजूबाजूला कर्ज देणारी मंडळीही हात झडकतात. दुबार, तिबार पेरणीचे संकट तसे पूरग्रस्तांना नित्याचेच झाले. आयुष्याच्या प्रश्नांवर विचार करण्यापेक्षा आजच्या भुकेचा प्रश्न जास्त सतावतो. मुलांना शिक्षण देऊ शकत नाही. बायकोला साडी घेऊन शकत नाही. आपण कुठल्या सुखाच्या गोष्टी करायच्या ?
सध्या पूर्व विदर्भात वैनगंगा नदीने रुद्ररुप धारण केले. गोसेखुर्द धरणाचे ३६ दरवाजे पूर्णता उघडले. गावेच नव्हे तर शहरे पाण्याखाली आली. २५ वर्षानंतर इतका मोठा महापूर पाहत असल्याचे जुनेजाणते मंडळी सांगतात. वैनगंगेच्या काठावरील सर्वसामान्य लोकांची लाखो हेक्टर जमीन शेतमालासह पाण्याखाली खपली. नुकसानीला अंतच नाही. कुणी घराच्या छतावर रात्र जागून काढत असल्याचे दिसते. कुणी घरातच अडकून पडल्याचे रडगाणे ऐकू येते. हे हुंदके सहज संपणारे नाहीत. सिंचनासाठी जसे नद्यांवर धरणे बांधलीत तसे पूर परिस्थितीवर नियंत्रणाचे उपाय करण्यात आपण नापास झालो.
पूर परिस्थितीचा आढावा घेत असताना माणुसकी आणि मानवधर्म जिवंत असल्याचे दाखले निश्चितच मिळतात. थोडेफार जगण्यासाठी अन्नधान्य, कपडे लोक देतीलही पण वर्षभराच्या दिलासाचे काय ? रोजमर्रा भाकर तुकड्याचा संघर्ष कदाचित अशाच एखाद्या महापुरात वाहून तर जाणार नाहीत ? असे कित्येक भितीदायक प्रश्न यानिमित्ताने कित्येक वर्षापासून अनुत्तरीत आहेत.
- अविनाश पोईनकर,
बिबी, ता.कोरपना, जि.चंद्रपूर
मोब. ७३८५८६६०५९
(लेखक साहित्याचे अभ्यासक व ग्रामीण विकास चळवळीतील कार्यकर्ते आहेत.)