अवैध रेती वाहतूक करणार्या ट्रॅक्टरने युवकाला चिरडले.
(आधार न्यूज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- जिल्ह्यातील रेती घाटाचे लिलाव झालेले नसून सर्वत्र बांधकाम मात्र नियमितपणे व पुर्ण क्षमतेने होत असुन इतक्या मोठ्या प्रमाणात जिल्ह्यात रेती कशी व कुठुन येते ह्याचे रहस्य जिल्हा व तालुका प्रशासनास माहिती असुनही अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अर्थपुर्ण मौन व दुर्लक्ष सामान्य जनतेला चांगलाच कळला असुन ह्यामुळे निसर्गाचे दोहन व पर्यावरणाची अपरिमित हानी होत असुनही अर्थपुर्ण संबंधांमुळे मिळणारे आशिर्वाद राजुरा तालुक्यातील एका निष्पाप नवयुवकाच्या जिवावर बेतल्याची हृदयद्रावक घटना घडली असुन अवैध रेती वाहतूक करणार्या ट्रॅक्टर खाली 16 वर्षीय उमेश सोनुर्ले चिडल्या गेल्याची दुर्दैवी घटना तालुका मुख्यालयापासुन 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या विहिरगाव येथे घडली आहे.
वर्धा नदी पात्र व जंगलातील अनेक नाल्यातून मोठ्या प्रमाणात अवैध रेती उत्खनन सुरु असून हायवा व ट्रॅक्टरच्या माध्यमाने मोठ्या प्रमाणात अवैध रेती वाहतूक जोमाने सुरु आहे. ह्या अवैध रेती वाहतूकदारांना राजकीय तसेच अधिकाऱ्यांचे अर्थपुर्ण पाठबळ मिळत असल्याने तस्करांचे मनोबल वाढले असुन आजची घटना त्याचेच परिपाक असल्याचे सिद्ध करत आहे.
विहीरगाव येथील शेतकरी पुंडलिक सोनुर्ले ह्यांचा मुलगा उमेश नेहमीप्रमाणे सकाळी शेतात गेला होता. शेताचे काम आटोपून सायकल ने परत येत असतांना गावाजवळच अवैध रेती उत्खनन करून भरधाव जाणाऱ्या ट्रॅक्टरने त्याला चिरडले. यात उमेशचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना आज सकाळी ७ च्या दरम्यान घडली.
अपघात होताच ट्रॅक्टर चालक व मजदुर पळून गेले. घटनेची माहिती मिळताच कुटूंबियांनी टाहो फोडला. या घटनेमुळे संतप्त नागरिकांनी विहीरगाव येथे चक्काजाम केला असून परिसरात तणाव निर्माण झाला असून अवैध रेती उत्खनन करणाऱ्या ट्रॅक्टर वर नंबरची नोंद नसल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
घटनेची माहिती मिळताच पोलीस चमू घटनास्थळी दाखल झाली असून परिसरात त्यांनी पंचनामा तसेच इतर कायदेशीर कारवाई सुरू केली आहे. परिसरात असलेल्या तणावपूर्ण वातावरणमुळे नागरिकांनी संयम ठेवावा अशी विनंती करण्यात येत असुन दोषींवर कारवाई करण्यात येणार असल्याचे पोलिसांनी म्हंटले आहे.