सोशल मीडियावर व्हिडिओ झाला होता व्हायरल......
Bhairav Diwase. Dec 18, 2020
पिंपरी:- वाहतूक नियमन करत असताना पिंपरीतील शगुन चौकात एका वाहतूक पोलिस महिलेने कारवाई न करण्यासाठी एका तरुणीकडून पैसे घेतले. याचा व्हिडीओ सोशलमीडियावर जोरदार व्हायरल झाला. याबाबत वाहतूक विभागाकडून कसुरी अहवाल सादर केल्यानंतर संबंधित वाहतूक पोलिस महिलेचे निलंबन करण्यात आले.
स्वाती सोन्नर असे निलंबन झालेल्या वाहतूक पोलिस महिलेचे नाव आहे. त्या वाहतूक शाखेच्या पिंपरी विभागात कार्यरत आहेत.
सोन्नर आणि त्यांचे सहकारी वाहतूक पोलिस मंगळवारी (ता. 15) पिंपरी मधील साई चौकात कर्तव्य बजावत होत्या. दरम्यान, तिथे एका दुचाकीवरून दोन तरुणी आल्या. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी त्यांच्यावर कारवाई करण्यात येणार असल्याचे संबंधित वाहतूक पोलिस महिलेने त्यांना सांगितले. ही कारवाई टाळण्यासाठी काही रक्कम घेण्याचे ठरले. त्यानंतर पोलिस महिलेने ती रक्कम स्वीकारली.
दुचाकीवरील तरुणीने वाहतूक पोलिस महिलेच्या खिशात पैसे ठेवले आणि पोलिस महिलेने ते स्वीकारले असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपर्यंत हा व्हिडीओ पोहोचल्यानंतर कारवाई सुरु झाली. सहाय्यक आयुक्त श्रीकांत डिसले यांनी याबाबत कसुरी अहवाल उपायुक्तांकडे सादर केला. त्यावर निर्णय घेत सोन्नर यांचे निलंबन करण्यात आले.