चंद्रपूर:- चंद्रपूर विधानसभा निवडणुकीत गाजलेलं '२०० युनिट मोफत वीज' हे आश्वासन आता आमदार किशोर जोरगेवार यांच्यासाठी डोकेदुखी ठरू लागलं आहे. निवडणूक होऊन सहा वर्षे उलटली, तरी हे आश्वासन पूर्ण न झाल्याने चंद्रपूरकरांमध्ये तीव्र संताप पाहायला मिळतोय. आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हा मुद्दा पुन्हा एकदा तापला असून, काल रात्री बंगाली कॅम्प परिसरात आमदारांना नागरिकांच्या रोषाचा सामना करावा लागत आहे.
चंद्रपूर शहरातील बंगाली कॅम्प परिसरात आमदार किशोर जोरगेवार एका कार्यक्रमासाठी किंवा भेटीसाठी या भागात आले असता, स्थानिक नागरिकांनी त्यांना घेराव घातला. नागरिकांनी यावेळी "२०० युनिट हाय हाय" आणि "किशोर जोरगेवार हाय हाय" अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. विशेष म्हणजे, ज्या २०० युनिटच्या आश्वासनावर जोरगेवारांनी निवडणूक जिंकली होती, तेच आश्वासन आता त्यांच्या विरोधात शस्त्र म्हणून वापरलं जातंय.
२०१९ च्या निवडणुकीत किशोर जोरगेवार यांनी 'यंग चांदा ब्रिगेड'च्या माध्यमातून एक मोठी लाट निर्माण केली होती. चंद्रपूर हे वीज निर्मितीचं केंद्र असूनही येथील नागरिकांना महागडी वीज का? असा सवाल करत त्यांनी २०० युनिट मोफत देण्याचं वचन दिलं होतं. मात्र, सत्तेत वाटा असूनही किंवा सरकारला पाठिंबा देऊनही हे आश्वासन हवेतच विरल्याचा आरोप नागरिक करत आहेत. आता मनपा निवडणुका तोंडावर आहेत, त्यामुळे हा '२०० युनिटचा जुमला' जोरगेवारांना महागात पडणार का? अशी चर्चा शहरात रंगली आहे.
काही दिवसांपूर्वीच इंडस्ट्रियल इस्टेट भागातही त्यांना काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आणि सामान्यांच्या विरोधाला सामोरे जावे लागले होते. कालच्या बंगाली कॅम्पमधील घटनेने हे स्पष्ट केलंय की, सामान्य नागरिक आता आश्वासनांची हिशोब मागत आहेत. मनपा निवडणुकीच्या प्रचारात हा मुद्दा विरोधकांसाठी मोठं हत्यार ठरणार आहे.

