Chandrapur police: बंद घरांची रेकी करून घरफोडी करणारा परराज्यातील चोरटा जेरबंद!

Bhairav Diwase

चंद्रपूर:- शहरातून एक मोठी बातमी समोर येत आहे. 'कार'मधून येऊन घरफोड्या करणाऱ्या एका सराईत आंतरराज्य गुन्हेगाराला रामनगर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. खिडक्या दुरुस्त करण्याच्या बहाण्याने रेकी करून हा आरोपी लाखो रुपयांवर डल्ला मारत होता. 



चंद्रपूर शहरात गेल्या काही दिवसांपासून मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली होती. या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी आणि चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी विशेष सूचना दिल्या होत्या. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर, प्रमोद चौगुले उपविभागीय पोलीस अधिकारी, चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आसिफराजा शेख यांनी गुन्हे शोध पथकाला विशेष कामगिरीवर नेमले होते.

तपास सुरू असताना पोलिसांना दोन घरफोड्यांच्या पद्धतीत कमालीचे साम्य दिसून आले. तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांना एका संशयिताची माहिती मिळाली. मुस्तकीन शौकीन चौधरी नावाचा हा ४३ वर्षीय आरोपी, जो मूळचा मेरठ, उत्तर प्रदेशचा रहिवासी आहे, तो सध्या चंद्रपुरात वास्तव्यास होता.

या आरोपीची गुन्हे करण्याची पद्धत अत्यंत थरारक होती. हा इसम शहरात दार-खिडक्या बसवण्याचे किंवा दुरुस्तीचे काम करण्याच्या बहाण्याने फिरायचा. यादरम्यान तो बंद घरांची रेकी करायचा. संधी मिळताच स्वतःच्या कारने येऊन घरफोडी करायचा आणि पसार व्हायचा.

रामनगर पोलिसांनी या इसमावर पाळत ठेवली. अखेर, चोरीचा मुद्देमाल विक्रीसाठी घेऊन जात असताना पोलिसांनी त्याला रंगेहात पकडले. त्याच्याकडून १९ लाख ८४ हजार रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी कार जप्त करण्यात आली आहे.

रामनगर पोलिसांनी केलेली ही कारवाई शहरात चर्चेचा विषय ठरली आहे. सद्यस्थितीत आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील तपास रामनगर पोलीस करत आहेत.