चंद्रपूर:- चंद्रपूर शहर महानगर पालिकेची निवडणूक जाहीर होताच महानगर पालिका क्षेत्रात आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभुमीवर जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी गुरुवारी संबंधित यंत्रणेचा आढावा घेऊन सुचना दिल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या या बैठकीला जिल्हा पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन, मनपा आयुक्त अकुनूरी नरेश, उपायुक्त संदीप चिद्रवार, पोलिस उपअधिक्षक प्रमोद चौगुले, महावितरणच्या अधिक्षक अभियंता संध्या चिवंडे, वस्तु व सेवा कर विभागाचे उपायुक्त संतोष हेमणे, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक नितीन धार्मिक, वाहतूक पोलिस निरीक्षक प्रवीण पाटील, पोलिस निरीक्षक आसिफरजा शेख, परिवहन विभागाच्या विभागीय नियंत्रण स्मिता सुतावणे व इतर अधिकारी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी गौडा म्हणाले, आदर्श आचारसंहितेचे पालन करणे आवश्यक आहे. निवडणुकीच्या काळात सर्व संबंधित यंत्रणांनी अतिशय गांभियाने आणि जबाबदारीने काम करावे. कोणतीही चूक होऊ देऊ नये. निवडणूक संदर्भात कोणतीही तक्रार येणार नाही, याची दक्षता घ्यावी. निवडणुकीच्या कामासाठी वेगवेगळे पथक तयार करून त्यांची प्रभावी अंमलबजावणी करावी. महानगर पालिकेने निवडणूक नियंत्रण कक्ष, विविध परवानग्या देण्यासाठी एक खिडकी योजना त्वरीत सुरू करावी, अशा सुचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.
यावेळी मनपा आयुक्त अकुनुरी नरेश यांनी सादरीकरणातून स्थापन करण्यात आलेल्या सनियंत्रण समितीचे कार्ये, निगराणी पथके, भरारी पथके, तक्रार निवारण आदींविषयी माहिती दिली.


