स्वस्त धान्य दुकानदारांवर कारवाई करण्याची मागणी.
भद्रावती:- भद्रावती शहरातील शासकीय स्वस्त धान्य दुकानदार सर्वसाधारण नागरिकांना विनाकारण त्रास देत असून त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी अखिल भारतीय ग्राहक पंचायतीच्या भद्रावती शाखेतर्फे तहसीलदार महेश शितोळे यांच्याकडे एका निवेदनाद्वारे नुकतीच करण्यात आली.
तहसीलदारांना सादर करण्यात आलेल्या निवेदनात म्हंटले आहे की, सर्वसाधारण नागरिक आपले धान्य विकत घेण्याकरीता शासकीय स्वस्त धान्य दुकानदारांकडे जातात,तेव्हा ते दुकानदार त्यांना माल संपला, आज दुकान बंद आहे,एखाद्याला तुमच्या नावाचे राशन आले नाही,अशी उडवाउडवीची उत्तरे देतात.तसेच ग्राहकांसोबत उद्धट बोलतात.असा आरोपही निवेदनात करण्यात आला आहे.
यासंदर्भात ग्राहक पंचायतकडे तक्रारी आल्याचेही निवेदनात नमुद करण्यात आले आहे.त्याअनुषंगाने निवेदनातून काही मागण्याही करण्यात आल्या आहेत.त्यात दुकानाची वेळ व आठवड्यातील दिवस याची माहिती ठळक अक्षरात दुकानाच्या दर्शनी भागावर लावण्यात यावी,चालू महिन्यात कोणते धान्य व इतर सामान मिळणार याचे फलक लावण्यात यावे,धान्य व इतर सामानांचा आलेला साठा व वितरित झालेले धान्य याची माहिती असलेले फलक लावण्यात यावे,दुकानातून विकल्या जाणा-या प्रत्येक वस्तुची किंमत माहिती फलकावर लिहिण्यात यावी.या मागण्यांचा समावेश आहे.
निवेदन सादर करताना अ.भा.ग्राहक पंचायतीच्या भद्रावती शाखेचे पदाधिकारी प्रवीण चिमूरकर, वामन नामपल्लीवार, वसंत वऱ्हाटे, पुरुषोत्तम मत्ते, गुलाब लोणारे, गोपिचंद कांबळे, मोहन मारगोनवार उपस्थित होते.