कार मधील ५ जण सुदैवाने बचावले.
वरोरा:- आपल्या नातेवाईकांच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी हिंगणघाट वरून चंद्रपूरच्या दिशेने जात असलेल्या फोर्ट फिगो कार ने टेमुर्ड्या समोरील येन्सा गाव जवळील व्हिडिओकॉन कॉलोनी जवळ अचानक पेट घेतला.
ही बाब ड्रायव्हरच्या लक्षात आल्याने त्याने गाडी थांबल्यावर काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि त्यातच ती कार जळून खाक झाली. सुदैवाने चालकाने प्रसंगावधान दाखवल्यामुळे कार मधील पाचही व्यक्ती बचावले. यामध्ये कोणतीही जीवित हानी झाली नसली तरी मात्र वित्त हानी झाली आहे. ही घटना रविवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
सविस्तर वृत्त असे की, हिंगणघाट येथील नागरिक चंद्रपूर येथील नातेवाईकाकडे कार्यक्रम असल्यामुळे त्यात सहभागी होण्यासाठी फोर्ट फिगो कार क्र. एम एच ४९ बी ०५९६ ने निघाले असता टेमुर्डा जवळ कार मध्ये तांत्रिक बिघाड होऊन कार मध्ये आग लागली. कारच्या बोनेट मधून धुर निघत असल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात आले. नागपूर चंद्रपूर महामार्गावरील येन्सा गावाजवळील व्होल्टाज कॉलोनी जवळ चालकाने तात्काळ कार रस्त्याच्या कडेला कार थांबवून सर्वांना खाली उतरण्याच्या सूचना दिल्या. ते सर्व कारमधून उतरताच कार ने जोरदार पेट घेतला. परिसरातील नागरिकांनी बचावासाठी धाव घेतली, कुणीतरी पोलीस स्टेशनला कळविले. वरोरा पोलिस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश चवरे, नितीन भैसारे, वाहतूक पोलीस चंद्रकांत चिकणकर, बंडू चौधरी तात्काळ घटनास्थळी पोहचले.
तत्पूर्वी पोलिसांनी जीएमआर कंपनी व नगर परिषदेच्या अग्निशामक दलाला फोन केला परंतु त्यातील फक्त नगर परिषद अग्निशामक दलाने घटनास्थळाकडे धाव घेतली. यात वारंवार विनंती करुनही जीएमआर कंपनीच्या अग्निशमन दलाचे कोणतेही सहकार्य मिळाले नाही. दुसरी कडे तात्काळ घटनास्थळी पोहोचून न.प. च्या अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले. परंतु आग इतकी भीषण होती की काही मिनिटांतच कार जळून खाक झाली. वाहतूक पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून महामार्गावरील वाहतूक काही वेळ बंद ठेवली. त्यानंतर न.प. अग्निशामक दलाच्या रवी बरसे, स़तोष पातालबन्सी, राम बिरीया, शिवा बरसे, राकेश बिरीयाच्या टिमने शर्थीचे प्रयत्न करीत आग पूर्णतः विझविली. या भीषण आगीत कार पूर्णतः जळून खाक झाली. मात्र यात कार मधील सर्व पाचही जण बचावले.