आर. टी. वन वाघ पकडण्याचे श्रेय एकट्याचे नाही.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) राहुल थोरात, राजुरा
राजुरा:- पत्रकारितेला लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून मान्यता आहे. ज्या गोष्टी प्रशासन, लोकप्रतिनिधीला दिसत नाही त्या पत्रकारांच्या नजरेतुन सुटत नाही त्यामुळे रेती चोरी, कोळसा चोरी, दारू विक्री, कोंबडा बाजार अशा बातम्या सातत्याने प्रकाशीत करीत असतांना शेतकरी, शेतमजूर, कामगार तथा सामान्य जनतेच्या प्रश्नावरही पत्रकारांनी लिहीने गरजेचे असल्याचे मत राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री सुभाष भाऊ धोटे यांनी पत्रकार दिन कार्यक्रमात बोलतांना व्यक्त केले.
दर्पणकार स्व. बाळशास्त्री जांभेकर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ राजुरा तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित पत्रकार दिन सत्कार सोहळ्याचे अध्यक्षीय भाषणात त्यांनी राजुरा विधानसभा क्षेत्रात शेतकरी, शेतमजूर, कामगारासोबतच प्रशासकीय अडचणीच्या समस्या तसेच शैक्षणिक समस्या आहेत. त्यांचा शोध घेऊन त्या सामान्य वाचकापर्यंत प्रशासन, लोकप्रतिनिधी पर्यंत पोहचविल्या पाहिजे. राजुरा भागात अनेक वर्षापासून भोगवटदार दोन ची प्रकरणे प्रलंबित आहेत. वनविभागाच्या नवीन नियमानुसार अनेक विकास कामे रखडली आहेत. उद्योगातील कामगाराचे प्रश्न आहेत या बाबीचा पाठपुरावा करून प्रशासनावर दबाव निर्माण केल्यास अनेक समस्या मार्गी लागण्यास मदत होऊ शकते परंतु यावर पत्रकार मंडळी कधीच लिहीत नाही ही फार मोठी शोकांतिका असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनाच्या अनेक जनहितकारक योजना आहेत परंतु त्या सामान्य जनतेपर्यंत पोहचत नाही. या योजना पत्रकार त्यांच्यापर्यंत पोहचवू शकतात. सन 2020 हे वर्ष अत्यंत वेदनादायी होते या काळात कोरोनामुळे अनेक नागरिक मृत्युमुखी पडले. लोकांचे रोजगार गेले अशाही परिस्थितीत गरजूंच्या राहण्याची, खाण्यापिण्याची, आरोग्याची, स्वच्छतेची काळजी प्रशासनिय सेवेतील कर्मचाऱ्यांनी स्वयंसेवी संघटनांनी घेतली. यामध्ये तहसील, आरोग्य विभाग, नगर परिषद, पोलीस, आशा वर्कर यांनी केलेल्या कामाची दखल घेतली पाहिजे. विशेषकरून ज्या डॉक्टरांनी, आरोग्य कर्मचाऱ्यांनी, आशा वर्करनी स्वतःचा जीव सांभाळून दुसऱ्याचा जीव वाचविण्यासाठी केलेले प्रयत्न वाखानव्या सारखे आहे. अशा लोकांचा राजुरा तालुका पत्रकार संघाने सन्मान करून त्यांना काम करण्याची ऊर्जा दिली आहे. असे सांगत पत्रकारांनी राबविलेल्या उपक्रमाचे त्यांनी अभिनंदन केले.
राजुरा परिसरात दहा नागरिकांचा बळी घेणाऱ्या आर. टी. वन वाघाला पकडण्याचे श्रेय एकट्या गर्कल किंवा गलगट यांचे नसून वाघाला पकडण्यासाठी दिवस रात्र राबणाऱ्या वन कर्मचाऱ्यांचे पिंजऱ्यात रात्रभर बसणाऱ्या वन मजुरांचे असल्याचे परखड मत व्यक्त करून अशा लोकांचीही दखल घेतल्या गेली पाहिजे. असे त्यांनी आपल्या भाषणात सांगितले.
राजुरा तालुका पत्रकार संघांनी मागणी केल्याप्रमाणे संस्थेचा इमारती मध्ये डिजिटल अभ्यासिका निर्माण करण्यासाठी दहा लक्ष निधी देण्याची घोषणा व्यासपीठावरुन केली.
याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक माजी आमदार ऍड. वामनराव चटप, माजी आमदार सुदर्शन निमकर यांनी आपले विचार मांडले. व्यासपीठावर नगराध्यक्ष अरुण धोटे, श्रीमती सुमनताई मामुलकर, ऍड निनाद येरणे, राधेश्याम अडाणिया, ठाणेदार नरेंद्र कोसुरकर इत्यादी मान्यवरांची उपस्थिती होती.
पत्रकार दिनाचे औचित्य साधून जेष्ठ पत्रकार मसूद अहमद, सिद्धार्थ गोसावी, रत्नाकर चटप, संतोष कुंदोजवार, गणेश बेले यांना विविध स्मृती पुरस्कार देऊन मान्यवरांचा हस्ते सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणें कोरोना काळात आपले जीव तळहातावर घेऊन जनतेची सेवा करणारे उपजिल्हा रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. लहुजी कुळमेथे, आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश नगराळे, डॉ बिपीनकुमार ओदेला, डॉ माधुरी वैध, मुख्य परिचारिका रिता रॉय, प्रितु झाडे, उमेश डाहाळे, संजय मंथनवार, आरोग्य सेवक अनिल देठे, बालाजी गोटमुखले, मंगला चव्हाण, आशा सेविका, किरण कलास्केकर, बबिता तालन, मंगला मेश्राम, नगर परिषद कर्मचारी निलेश टाक यांना कोविडयोद्धा म्हणून सन्मान चिन्ह, शॉल श्रीफळ व प्रमाणपत्र देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी मुक्त पत्रकार व विधी अभ्यासक ऍड. दीपक चटप यांचे शेती कायदे विषयक पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन आनंद चलाख प्रस्ताविक अनिल बाळशराफ तर आभार भीमय्या बोर्डवार यांनी केली.