चंद्रपूर:- राज्यातील नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकांचे निकाल जाहीर होत असताना चंद्रपूर जिल्ह्यातील निकालांनी भाजपसह राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली आहे. विशेषतः बल्लारपूर, वरोरा, मूल आणि राजुरा या चार महत्त्वाच्या नगरपरिषदांच्या निकालांकडे जिल्ह्याचे लक्ष लागले होते. या निकालांनंतर सर्वसामान्य मतदारांपासून ते भाजप कार्यकर्त्यांपर्यंत एकच भावना व्यक्त होत आहे, ती म्हणजे माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते आमदार सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिपद नाकारण्यात आल्याचा फटका पक्षाला स्थानिक पातळीवर बसल्याची.
चंद्रपूर जिल्ह्यात एकूण अकरा नगरपरिषदांची निवडणूक झाली असून त्यात चिमूर, भिशी, ब्रह्मपुरी, नागभिड, राजुरा, गडचांदूर, बल्लारपूर, मूल, भद्रावती, वरोरा आणि घुग्घुस यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या वेळापत्रकानुसार मतदान पार पडले आणि २१ डिसेंबर रोजी निकाल जाहीर झाले. या निकालांमधून जिल्ह्यातील राजकीय प्रवाह आणि जनतेची मनोवृत्ती स्पष्टपणे समोर आली आहे.
भाजपच्या दृष्टीने पाहिले तर २०१७ च्या तुलनेत अनेक ठिकाणी स्थिती बदलल्याचे चित्र आहे. २०१७ मध्ये बल्लारपूर नगरपरिषदेत भाजपचे वर्चस्व होते. त्या निवडणुकीत भाजपने ३२ पैकी १५ जागा जिंकत नगरपरिषद काबीज केली होती आणि हरीश शर्मा नगराध्यक्ष झाले होते. काँग्रेसला ११, शिवसेनेला ३ तर इतरांना ३ जागा मिळाल्या होत्या. वरोरा नगरपरिषदेतही भाजप १० जागांसह सर्वात मोठा पक्ष ठरला होता. मूल नगरपरिषदेत तर भाजपने १७ पैकी १६ जागा जिंकून एकहाती सत्ता मिळवली होती. राजुरा मात्र काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला होता, जिथे काँग्रेसने ९ जागा जिंकत भाजपला केवळ ३ जागांवर रोखले होते.
मात्र यावेळी परिस्थिती वेगळी असल्याची भावना स्थानिक पातळीवर व्यक्त होत आहे. भाजपचे ज्येष्ठ आणि निष्ठावंत नेते असलेले सुधीर मुनगंटीवार यांना मंत्रिमंडळात स्थान न दिल्यामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील मतदारांमध्ये नाराजी असल्याची कुजबूज निवडणुकीपूर्वीपासून होती. त्याचे पडसाद या निकालांमध्ये उमटल्याचे अनेक कार्यकर्ते खुलेपणाने बोलत आहेत. भाजपा महायुतीत ४२ मंत्र्यांच्या मंत्रिमंडळात भाजपचे केवळ ९ मंत्री आहे.
प्रदीर्घ अनुभव, प्रशासनावर पकड आणि जनसामान्यांमध्ये विश्वास असलेले मुनगंटीवार यांना डावलण्यात आल्याने पक्षातील निष्ठावंत वर्ग दुखावल्याची भावना आहे. मुनगंटीवार मंत्रीपदी असते तर जिल्ह्यातील वातावरण वेगळे असते आणि भाजपचे चित्रही वेगळे दिसले असते,” अशी प्रतिक्रिया अनेक ठिकाणी ऐकायला मिळत आहे. चंद्रपूर मतदारसंघाने यानिमित्ताने पक्ष नेतृत्वाला एक संदेश दिल्याचेही बोलले जात आहे. विशेषतः बल्लारपूर, वरोरा आणि मूलसारख्या ठिकाणी भाजपला अपेक्षित यश न मिळण्यामागे स्थानिक असंतोष आणि नेतृत्वाबाबतची नाराजी कारणीभूत ठरल्याचे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.
राज्यपातळीवर २०१७ च्या नगरपरिषद निवडणुकांमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला होता. त्या वेळी १९२ नगरपरिषदांपैकी ७२ नगरपरिषदा भाजपने जिंकल्या होत्या. काँग्रेसने ३६, शिवसेनेने २६, राष्ट्रवादी काँग्रेसने २५ तर अपक्ष आणि इतर पक्षांनी २५ ठिकाणी विजय मिळवला होता. तरीही स्थानिक पातळीवर नेतृत्व, कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास आणि संघटनात्मक बळ या घटकांचा निकालांवर मोठा प्रभाव असतो, हे चंद्रपूर जिल्ह्यातील निकालांनी पुन्हा अधोरेखित केले आहे.
एकूणच, चंद्रपूर जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक निकाल हे केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांचे निकाल न राहता, भाजपसाठी आत्मपरीक्षणाची घंटा ठरले आहेत. सुधीर मुनगंटीवार यांच्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा स्थानिक राजकारणावर झालेला परिणाम, पुढील काळात होणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत
कोणती दिशा घेईल, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

