ग्राम पंचायतीच्या निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज.

Bhairav Diwase
भद्रावती तालुक्यात ५३ ग्राम पंचायतीमध्ये होणार मतदान.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- दि.१५ जानेवारी रोजी पार पडणा-या ग्राम पंचायत निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज झाले असून भद्रावती तालुक्यात ५३ ग्राम पंचायतीमध्ये मतदान पार पडणार आहे.
            यंदाच्या सार्वत्रिक निवडणुकीत भद्रावती तालुक्यात एकूण ५७ ग्राम पंचायतीमध्ये निवडणूक कार्यक्रम घोषित करण्यात आला. त्यात कचराळा, पानवडाळा, विसापूर(रै.) आणि कोकेवाडा(मा.) या ग्राम पंचायतीत सर्वच सदस्य अविरोध निवडून आल्याने आता ५३ ग्राम पंचायतींमध्ये मतदान पार पडणार आहे. या ग्राम पंचायतींसाठी घेण्यात येणा-या मतदानाकरीता १८८ मतदान केंद्रे तयार करण्यात आली असून २३२ मतदान केंद्राध्यक्ष, ६९६ मतदान अधिकारी आणि जवळपास २०० पोलिस विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.दि.१४ रोजी सकाळी १० वाजता पासूनच मतदान पथके रवाना करण्यात आली.त्याकरिता एस.टी.बसेस, स्कुल बसेस आणि खाजगी गाड्यांचीही व्यवस्था करण्यात आली.२०८ ई.व्ही.एम.यंत्रे सज्ज असून १२ क्षेत्रीय अधिकां-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यात दोन राखिव असून १० अधिका-यांकडे काही अपवाद वगळता प्रत्येकी ६-६ ग्राम पंचायती देण्यात आलेल्या आहेत.एका क्षेत्रीय अधिका-यांकडे माजरी आणि देऊळवाडा या दोनच ग्राम पंचायतींची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यात माजरी ही तालुक्यातील सर्वात मोठी ग्राम पंचायत असून येथे २५ मतदान केंद्रे आहेत.तर देऊळवाडा येथे ३ मतदान केंद्रे आहेत. 
                  या निवडणुकीत ५३ ग्राम पंचायतीमधील ७८ हजार ३६८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार असून त्यात ४१ हजार २६० पुरुष आणि ३७ हजार १०८ महिला मतदारांचा समावेश आहे.सकाळी ७.३० वाजतापासून मतदान सुरु होणार असून सायंकाळी ५.३० वाजता संपणार आहे.तालुक्यातील संवेदनशील मतदान केंद्रे म्हणून कोंढा(रै.), चंदनखेडा, घोडपेठ, मुधोली, माजरी, आगरा, सागरा, आष्टा या गावांचा उल्लेख केला जातो. निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार महेश शितोळे, सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून नायब तहसीलदार एस.आर.तनगुलवार, एस.यु.भांदककर, मास्टर ट्रेनर व पर्यवेक्षक म्हणून प्रा.सुरेश परसावार आणि प्रा. विनोद घोडे हे जबाबदारी पार पाडत आहेत.