Top News

कोरोना योद्ध्यांचा सत्कार करुन पत्रकार संघाने समाजाला प्रेरीत करण्याचे कार्य केले:- अनिल धानोरकर.

भद्रावतीत कोरोना योद्ध्यांचा थाटात सत्कार.
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- कोरोना योद्ध्यांचा सत्कार करुन महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या भद्रावती तालुका शाखेने समाजाला प्रेरीत करण्याचे महत्वाचे कार्य केले, असे गौरवोद् गार भद्रावती नगर परिषदेचे नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांनी काढले. 
            ते महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, मुंबईच्या भद्रावती तालुका शाखेतर्फे पत्रकार दिन व दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंती निमित्य आयोजित भद्रावती शहरातील कोरोना योद्ध्यांच्या सत्कार समारंभाप्रसंगी उद्घाटक म्हणून बोलत होते. ते पुढे म्हणाले की, योद्धा या शब्दातच त्याचे महत्व दडलेले आहे. योद्धा या शब्दाचा अर्थ कठीण समयावर मात करते ती व्यक्ती. कोरोना या महामारीचे देशावर संकट आले, तेव्हा खुप भिती पसरली होती.कोणी काम करायला तयार नव्हते. मात्र सरकारी कर्मचारी यांनी जीवाची पर्वा न करता कार्य केले. अशा ख-या कोरोना योद्ध्यांची दखल घेऊन मराठी पत्रकार संघाने त्यांचा सत्कार केला, ही खरोखरच अभिनंदनिय बाब असल्याचे धानोरकर यावेळी म्हणाले.
                  याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे पूर्व विदर्भ अध्यक्ष प्रा. महेश पानसे उपस्थित होते. तर प्रमुख अतिथी म्हणून तहसीलदार महेश शितोळे, पोलिस निरीक्षक सुनीलसिंग पवार, न.प.मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर, पं.स.चे संवर्ग विकास अधिकारी डाॅ. मंगेश आरेवार, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ.मनीष सिंग, पूर्व वैद्यकीय अधीक्षक डाॅ.आनंद किन्नाके, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ.आसुटकर, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर वर्मा, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सुनील बोकडे, जिल्हा सरचिटणीस राजू कुकडे, युवा सामाजिक कार्यकर्ते विनायक गरमडे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. 
                        सर्वप्रथम नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या हस्ते सरस्वती पूजन करुन, दीप प्रज्वलन करुन आणि बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करुन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन स्वागत करण्यात आले. तसेच स्वागतोपरांत नगराध्यक्ष, तहसीलदार, पोलिस निरीक्षक, मुख्याधिकारी, संवर्ग विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधीक्षक, पोलिस अधिकारी, वाहतूक शिपाई, डाॅक्टर्स, परिचारिका, आशा वर्कर्स, पत्रकार, सामाजिक संघटना यांचा सन्मानचिन्ह, सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच कोरोना काळात वाचकांपर्यंत वृत्तपत्र पोहोचविण्याचे विशेष कार्य करणा-या अनिल कार्लेकर, ज्ञानेश्वर इंगोले, प्रणय पतरंगे, मंगेश डाखरे, रामू वालदे आणि संचालक ठमके या वृत्तपत्र वितरकांचाही याप्रसंगी सन्मानचिन्ह,सन्मानपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
   यावेळी वसुंधरा दिनानिमित्य भद्रावती नगर परिषदेचे मुख्याधिकारी सूर्यकांत पिदुरकर यांनी उपस्थितांना वसुंधरेचे संरक्षण करण्याची शपथ दिली. तसेच कोरोना लढ्यात शहीद झालेल्या योद्ध्यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी झालेल्या भाषणात तहसीलदार शितोळे यांनी कोरोना काळात पत्रकारांनीही महत्वाची कामगिरी बजावली असून त्यांचाही सत्कार होणे उचित असल्याचे सांगितले.आपल्या अध्यक्षीय भाषणातून प्रा.महेश पानसे यांनी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ ही राज्यव्यापी संघटना असून या संघटनेचे महाराष्ट्रात मोठे कार्य आहे. तसेच या संघटनेची सदस्य संख्याही खुप प्रमाणात आहे. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डाॅ.मनीष सिंग आणि सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर वर्मा यांचीही भाषणे झाली.
          कार्यक्रमाचे प्रास्ताविक पत्रकार संघाचे अध्यक्ष शंकर बोरघरे यांनी केले.संचालन आनंद सिंगितवार यांनी केले. तर आभार रुपचंद धारणे यांनी मानले.स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली.
               कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी शंकर बोरघरे, अशोक पोतदार, सुनील पतरंगे, अब्बास अजानी, जावेद शेख, शाम चटपल्लीवार, रुपचंद धारणे, ईश्वर शर्मा, सुनील बिपटे, वतन लोणे, प्रदीप मडावी, सुनील दैदावार, दीपक आसुटकर, पवन शिवनकर, महेश निमसटकर, जितेंद्र माहुरे यांनी परिश्रम घेतले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने