आदिवासी युवतीवर लग्नाचे आमिष दाखवुन लैंगिक अत्याचार.


Bhairav Diwase. March 04, 2021
कोरपना:- महाराष्ट्र तेलंगणा सीमेवर असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील कोरपना तालुक्यातील एका आदिवासी युवतीवर लग्नाचे आमिष दाखवुन एका युवकाने अत्याचार केल्याची घटना समोर आली असुन मुलीच्या तक्रारीवरून कोरपना पोलिसांनी विविध कालमांन्वये गुन्ह्याची नोंद केली असुन आरोपी युवक फरार असल्याचे कळले आहे.
सविस्तर वृत्त असे की, तालुका मुख्यालयापासुन जवळच असलेल्या गावातील एका मुलीबरोबर समाज माध्यमातुन ओळख निर्माण करून एका युवकाने मैत्री केली. हळुहळु ह्या मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाल्याचे भासवून त्या युवकाने सदर युवतीचे अनेकदा लैंगिक शोषण केले असुन ह्यासाठी त्याने मुलीला अनेकदा लग्नाचे आमिष सुद्धा दाखवले होते.


ही युवती चंद्रपूर येथे शिकत असतानाही ह्या युवकाने तिला लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचा आरोप पीडित युवतीने केला असुन पुढे पोलीस भरतीपूर्व प्रशिक्षण सुरू असतानासुद्धा सदर युवतीच्या मैत्रिणीच्या खोलीवर युवकाने आपल्याशी जबरदस्तीने शारीरिक संबंध प्रस्थापित केल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

ह्या युवकाने युवतीच्या जातीची माहिती आधीच घेतली होती व आपण आंतरजातीय विवाह करण्यास तयार असल्याचे वारंवार सांगुन सदर युवतीसोबत अनेकदा शारीरिक संबंध प्रस्थापित केले मात्र आता त्याने लग्नाला नकार दिला असल्याचे कळते. सदर युवक माजी सरपंचाचा मुलगा असुन त्याचे वडील एका राजकिय पक्षाचे तालुका उपाध्यक्ष आहेत हे विशेष.

युवतीने आपल्या आई वडिलांसह पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असुन प्रकारांचे गांभीर्य ओळखून कोरपना पोलिसांनी तत्काळ गुन्ह्याची नोंद केली असुन आरोपी विरूद्ध भा. दं. वि. 376(2)(n), अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम 3(1)(w)(ii) व 3(2)(va) नुसार गुन्हा नोंद करून तपास सुरू केला आहे. युवतीने पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती मिळताच युवक फरार झाला असुन पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने