Click Here...👇👇👇

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून चक्क मृतदेहच झाला गायब.

Bhairav Diwase
मृतदेह अदलाबदल होण्याची शक्यता?
Bhairav Diwase. April 24, 2021
यवतमाळ:- शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात २० एप्रिलला मृत्यू पावलेल्या रूग्णाचा मृतदेह चार दिवसानंतरही नातेवाईकांना मिळाला नाही. यामुळे नातेवाईकांनी वैद्यकीय महाविद्यालयाच्या कारभारावर रोष व्यक्त करीत शुक्रवारी शहर पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली. तसेच वैद्यकीय महाविद्यालयासमोर उपोषण सुरू केले. नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे येथील रोशन भीमराव ढोकणे या तरुणाचा यवतमाळच्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. वैद्यकीय महाविद्यालयाने मृत्यूनंतर संबंधित कुटुंबीयांना तशी सूचना दिली.

यानंतर मृतदेह घेण्यासाठी गेलेल्या कुटुंबीयांना मृतदेहच दिला नाही. शवागार ते रूग्णालय अशा वारंवार येरझारा मारल्यानंतरही रोशनचा मृतदेह गवसला नाही. या गंभीर प्रकाराची तक्रार कुटुंबीयांनी शहर ठाण्यात नोंदविली आहे. वैद्यकीय महाविद्यालयाच्या करभारावर त्यांनी रोष नोदंविला आहे. शुक्रवारी वैद्यकीय महाविद्यालयासमोर कुटुंबीयांनी मृतदेहासाठी आंदोलन केले. भीमराव बंडूजी ढोकणे, सुनंदा भीमराव ढोकणे, संदीप भीमराव ढोकणे, सिध्दार्थ व्यंकट ढोकणे यांनी उपोषण सुरू केले. अधिष्ठातांना त्या विषयाचे पत्रही त्यांनी लिहिले आहे. या प्रकरणात संबंधितांची चौकशी करून कारवाई करावी, या मागणीसाठी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मृतदेह अदलाबदल झाल्याची शक्यता?

 वैद्यकीय महाविद्यालयात दररोज सरासरी 25 ते 30 रुग्णांचा मृत्यू होत आहे. करोनाबाधितांचा मृतदेह नेताना रोशनचा मृतदेह चुकीने नेण्यात येऊन त्याच्यावर अंत्यसंस्कारही झाले असण्याची शक्यता आहे. येथील शवविच्छेदनगृहात एका मध्यमवयीन अनोळखी पुरुषाचा मृतदेह दोन दिवसांपासून ठेवलेला आहे. त्याची ओळख अद्यापही पटलेली नाही. त्यामुळे कुणीतरी चुकून रोशनचा मृतदेह घेऊन गेले आणि हा मृतदेह तसाच राहिला असण्याची शक्यता आहे. या मृतदेहाची ओळख पटवून त्याच्या नातेवाईकांना शोधण्याचे प्रयत्न सुरू आहे.