तालुका क्रीडा संकुलातील सुरू असलेल्या कामांच्या चौकशीची मागणी

Bhairav Diwase
भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांची क्रीडा आयुक्तांकडे तक्रार


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा : येथील तालुका क्रीडा संकुलात विविध कामे करण्यात येत आहे. यासाठी विधानसभा सदस्य स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत निधी उपलब्ध करून देण्यात आला. युवकांना सैन्य भरती, पोलीस भरती, मैदानी खेळ अशा मैदानी खेळाचा सराव करता यावा, यासाठी शासनाकडून तालुका स्तरावर क्रीडा संकुलाची निर्मिती करण्यात आली. यावर शासनाकडून मोठ्या प्रमाणावर निधी ही खर्च करण्यात येत आहे. मात्र क्रीडा विभागातील अधिकारी, अभियंता व कंत्राटदारांच्या लालसेपोटी शासनाच्या निधी कात्री लावून दर्जाहीन कामे होत असल्याचा आरोप करीत सुरू असलेल्या कामांची चौकशी करण्याची मागणी भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष सचिन डोहे यांनी निवेदनातून क्रीडा व युवा सेवा संचालनालयाकडे केली आहे.


राजुरा येथील तालुका क्रीडा संकुलाच्या बांधकामाला जवळपास 10 वर्ष पुर्ण झाले असून आजही येथील अनेक कामे प्रलंबीत आहेत. सध्या लांब उडीचे (Long Jump) मैदान निर्मिती व अन्य दुरूस्तीचे कामे करण्यात येत आहे. या कामांच्या गुणवत्तेबाबत अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे दिसून येते. लांब उडीच्या मैदानाचे बांधकाम सुरू असून मैदानाचे काम करतांना अंदाजीत 10 मीटर लांब, 3 मीटर रूंद व 1 मीटर उंच असे रेती भरण्यासाठी टाकी सारखे भिंतीचे बांधकाम करण्यात आले. परंतू भिंतीच्या मजबूतीसाठी कुठेच सिमेंट काँक्रीटचे पिल्लर किंवा कॉलम घेण्यात आले नसल्याने भिंतींना पायाभुत आधार नाही. काहीच दिवसात एका पावसामध्ये ही भिंत कोसळून पडली. त्याच कामात कोणतीही सुधारणा न कराता परत जुन्याच विटा वापरून भिंतीचे नव्याने बांधकाम केले जात आहे.


संकुलात सुरू असलेल्या दुरूस्तीच्या कामात अत्यंत कमी दर्जाचे साहित्य वापरण्यात येत आहे. या कामात कंत्राटदार व संबंधीत अभियंत्याकडून गैरव्यवहार होत असून कामांच्या गुणवत्तेवर संशय निर्माण होत आहे. यामुळे सर्व कामांची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
तसेच खुले व्यायाम शाळेसाठी बसविण्यात आलेल्या साहित्यांची ही मोड-तोड झाली असून अनेक साहित्य चोरीला गेले. मैदानाचे सपाटीकरण (Surface levelling) सुध्दा अपुर्ण आहे. शासकीय संकुलाचा एका खासगी प्रशिक्षकाकडून स्वत:चे प्रशिक्षण वर्ग चालविण्यासाठी वापर होत असून हे प्रशिक्षण सशुल्क आहे. यामुळे येथे सर्व सामान्यांना व्यायामास व फिरण्यास अडचणी येत असल्याचे ही तक्रारीत म्हटले आहे. तालुका क्रीडा संकुलात होत असलेल्या गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषी कंत्राटदार व अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या तक्रार निवेदनाची प्रत आमदार सुधीर मुनगंटीवार, माजी केंद्रीय राज्यमंत्री हंसराज अहीर, जिल्हाधिकारी व जिल्हा क्रीडा अधिकारी यांना पाठविण्यात आली आहे.