उपमहापौर राहुल पावडेंच्या मागणीची दखल घेवून आ. सुधीर मुनगंटीवार यांचे मुख्यमंत्री व आरोग्यमंत्र्यांना पत्र.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चंद्रपूर:- राज्याबाहेर मृत झालेल्या कोरोनाबाधीतांच्या मृत्यू प्रमाणपत्राचा प्रश्न सोडविण्याची मागणी चंद्रपुर महानगरपालिकेचे उपमहापौर राहुल पावडे यांनी आ. सुधिर मुनगंटीवार यांचे कडे केली आहे.
कोरोना प्रादुर्भावाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील शासकीय व खासगी रुग्णालयात व्हेंटीलेटर बेड तथा ऑक्सीजन उपलब्ध होत नसल्याने कोरोनाबाधित रूग्ण बाहेर राज्यात विशेषत: तेलंगणा व आंध्रप्रदेश राज्यातील मंचेरीअल, करीमनगर व कागजनगर येथील रुग्णालयात उपचारार्थ भरती करण्यात आले होते.
अशावेळी उपचारादरम्यान काही रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. मात्र तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यातील संबधीत रुग्णालय, महानगरपालिका, नगरपरीषद, ग्रामपंचायत, सदर रूग्णांच्या मृत्यूची नोंद घेण्यास टाळाटाळ करीत असल्याने मृतकांच्या नातेवाइकांस मृत्यू प्रमाणपत्र मिळण्यास अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
त्यामुळे दोन्ही राज्याच्या आरोग्य विभागाशी चर्चा करुन समस्या सोडविण्यात यावी, अशी मागणी उपमहापौर राहुल पावडे यांनी आमदार सुधिर मुनगंटीवार यांचे कडे केली आहे. या मागणीची दखल घेवुन हा विषय त्वरीत मार्गी लावण्यासंबधात आमदार सुधिर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे व आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना पत्र लिहिले आहे.
कोविड-१९ च्या दुस-या लाटेत सध्या सदर प्रश्न गंभीर झाला असुन यासाठी राहुल पावडे आ. सुधिर मुनगंटीवार यांच्या माध्यमातून युध्दपातळीवर प्रयत्नरत असल्याचे सांगण्यात आले आहे.