पावसाळ्यापूर्वी चिचडोह बॅरेज प्रकल्पाचे सर्व दरवाजे उघडण्यात येणार.

Bhairav Diwase
बॅरेज परिसरातील गावकऱ्यांनी व नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी व सतर्क रहावे.
Bhairav Diwase. May 25, 2021
चंद्रपूर:- यावर्षी हवामान खात्याच्या अंदाजानुसार पावसाळा 1 जून पासून सुरू होत आहे. बॅरेज मध्ये साठविलेला पाणीसाठा कमी करून सर्व 38 दरवाजे 1 जून 2021 ला उघडण्याचे नियोजित आहे. त्यामुळे नदीतील निम्न भागातील पाण्याच्या पातळीत वाढ होणार आहे.
वाढीव पाणी पातळीमुळे जीवित व वित्त हानी होऊ नये म्हणून सर्व लगतच्या गावांना व ग्रामपंचायतींनी सतर्क राहावे. नदीकाठावर जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील शेतामध्ये कामे करताना सतर्कता बाळगावी. नदीवर आंघोळ करतांना, मासेमारी करणारे, नदी घाटातून रेती काढणारे, पशुपालक, नदीतून ये-जा करणारे, बॅरेज परिसरातील गावकऱ्यांनी व नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घ्यावी व सतर्क रहावे,असे आवाहन लघु पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आलेले आहे.
शेतकऱ्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्वाकांक्षी असलेला चिचडोह बॅरेज प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात वैनगंगा नदीवर उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प शेतकऱ्यांसाठी वरदान ठरलेला आहे. या प्रकल्पामुळे पिण्याच्या पाण्याचाच नव्हे तर शेतीच्या सिंचनाचाही प्रश्‍न सुटला आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील वैनगंगा नदीवर, चामोर्शी तालुका मुख्यालयापासून उत्तरेस 5 किलोमीटर अंतरावर चिचडोह बॅरेजचे बांधकाम पूर्ण झाले असून सदर बॅरेज मार्कंडा देवस्थानापासून वैनगंगा नदीच्या वरचे बाजूस 4 किलोमीटर वर आहे. बॅरेजची एकूण लांबी 691 मीटर असून 15 मीटर लांब × 9 मीटर उंचीचे 38 लोखंडी दरवाजे बसविण्यात आलेले आहे. दिनांक 12 ऑक्टोबर 2020 पासून संपूर्ण दरवाजे बंद करण्यात आले होते.