(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे, भद्रावती
भद्रावती:- चंद्रपूर जिल्हयातील नियमित पिक कर्जफेड करणा-या शेतकरी बांधवांना प्रोत्साहनपर अनुदान देण्याची मागणी केंद्रीय मानवाधिकार संघटनेचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डाॅ. अंकुश आगलावे यांनी एका निवेदनाव्दारे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
नियमित पिक कर्जफेड करणा-या शेतक-यांना ५० हजाराचे अनुदान देण्याची घोषणा महाविकास आघाडी सरकारने मागील वर्षी अंदाजपत्रकाच्या दरम्यान केलेली होती. मात्र एक वर्षाचा कालावधी लोटूनही प्रोत्साहनपर अनुदान मिळालेले नाही.
महाराष्ट्र राज्य शासनाने २ लाख रूपयाचे कर्जमाफी दिली होती तेव्हाच ५० हजार रूपयाचे प्रोत्साहपर अनुदान नियमित कर्जफेड करणारे शेतकरी यांच्या खात्यात जमा करण्यास सांगितले होते. परंतू राज्य सरकारने अद्याप शेतक-यांच्या खात्यात अनुदान जमा केलेले नाही.
मागील वर्षी लाॅकडाउनच्या काळात शेतकरी बांधवाचे मोठे हाल व आर्थिक नुकसान झाले असून त्यांना शेतमाल विक्री करतांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. तरीही अनेक शेतकरी बांधवांनी पिक कर्जाचा भरणा वेळेवर केला.
शेतकरी बांधवांनी पिक कर्ज थकीत ठेवले असते तर कर्ज माफ झाले असते असा प्रश्न उपस्थित होत आहे. यामुळे शेतकरी नाराज झालेले आहे. लोकप्रतिनिधींनी या प्रश्नांकडे गंभीरतेने लक्ष देणे गरजेचे आहे.
चंद्रपूर जिल्हयातील शेतकरी बांधवांकडून नियमित कर्जफेड करणा-या शेतक-यांना तात्काळ ५० हजाराचे अनुदान खात्यात जमा करण्याची मागणी होत आहे. #Grants