Top News

चार युवकांच्या यशाने उंचावली जिल्हावासीयांची मान. #Chandrapur

(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- शाळा व महाविद्यालयांची संख्या वाढल्याने विविध ज्ञानशाखांतून शिक्षण घेण्याची संधी निर्माण झाली. यातून स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्याचा आत्मविश्वास विद्यार्थ्यांमध्ये वाढू लागला.
दशकभरात एमपीएससी उत्तीर्ण होण्याचाही टक्का वाढताना दिसतो. यंदा पहिल्यांदाच अंशुमन यादव, देवव्रत मेश्राम, आदित्य जीवने, सुबोध मानकर या चार युवकांनी देशातील सर्वोच्च संघ लोकसेवा आयोगाच्या (यूपीएसएसी) परीक्षेत यशाची मोहोर उमटविल्याने चंद्रपूर जिल्हावासीयांची मान उंचावली.
आदित्य जीवने.......
वरोरा:- येथील आदित्य चंद्रभान जीवने या युवकाने ३९९ व्या रँकिंगने यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. आदित्य हा मेकॅनिकल इंजिनिअर आहे. वडील आनंदनिकेतन महाविद्यालयात प्राध्यापक, तर आई शिक्षिका आहे. पहिल्या प्रयत्नात अपयश आले होते. मात्र, ध्येयपूर्तीसाठी पुन्हा तयारीला लागल्याचे आदित्यने सांगितले. परीक्षेनंतर काही दिवसांतच मला कोरोना संसर्ग झाला. जणू मरणाच्या दारातून बाहेर आलो. या कालावधीत मित्रांनी केलेले सहकार्य कदापिही विसरू शकत नाही. प्रशासनातील उच्चपदावर येऊन जनसेवा करण्याचे माझे ध्येय निश्चित होते. नियोजनबद्ध प्रयत्न केले आणि यश मिळाले. विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेचे स्वरूप लक्षात घेऊन अभ्यास केल्यास यश दूर नाही, असा संदेशही आदित्यने दिला. कोरानावर मातही याकाळात केली.
देवव्रत मेश्राम.....
सावली:- येथील देवव्रत वसंत मेश्राम याने ७१३ वी रँक प्राप्त करून यूपीएससी परीक्षेत बाजी मारली. चौथीपर्यंतचे शिक्षण जि.प. शाळा सावली येथून घेतले. देवव्रतचे वडील विश्वशांती विद्यालयाचे मुख्याध्यापक होते. खडकपूर आयआयटीत इलेक्ट्रॉनिक अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना पहिल्याच वर्षी वडिलांचे निधन झाले. पतीच्या निधनानंतर आईने तीनही मुलांना उत्तम संस्कार दिले. खडगपूरचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर दिल्ली येथे यूपीएसीची तयारी करीत होता. कुटुंबातील सर्व भावंडे उच्चविद्याविभूषित असून, मोठा भाऊ गोवा येथे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात, तर बहीण मुंबईत प्राध्यापक आहे. कुटुंबातून कुणीतरी प्रशासकीय सेवेत जावे, असे वडिलांचे स्वप्न होते. त्याचदृष्टीने मी ध्येय ठरविले. कठोर परिश्रम घेतले. अखेर स्वप्नपूर्ती झाली, याचा मनस्वी आनंद असल्याच देवव्रतने सांगितले.
सुबोध मानकर.....
मूल:- येथील सुबोध मानकर या युवकाने ६४८ रँकने यूपीएससी परीक्षेत यश मिळविले. सुबोधने प्राथमिक शिक्षण बालविकास प्राथमिक शाळा व माध्यमिक शिक्षण नवभारत विद्यालय मूल येथे पूर्ण केले. उच्च माध्यमिक शिक्षण नागपुरातील एम.पी. देव धरमपेठ सायन्स कॉलेज व पूणे येथील व्हीआयटी कॉलेजमधून पदवी तसेच बीटेक पदवीचे शिक्षण घेतले. तेव्हापासून त्यांनी स्पर्धा परीक्षेचा अभ्यास सुरू केला. २०१८ मध्ये यूपीएसी परीक्षा दिली. त्यादरम्यान इंडियन रेल्वे अकाउंट सर्व्हिस सिकंदराबाद येथे निवड झाली. सुबोध मानकर हा सध्या रेल्वे विभागात प्रशिक्षण घेत आहे. सिकंदराबादमध्ये राहूनच अभ्यास पूर्ण केला. कुटुंबीय व शिक्षकांनी दिलेल्या प्रेरणेमुळे मला हे यश मिळाल्याचे सुबोधने सांगितले. जिद्द, चिकाटी व परिश्रमाची तयारी असेल, तर ग्रामीण भागातील विद्यार्थी स्पर्धा परीक्षांचा गड सहजपणे सर करू शकतात. सुबोधचे वडील रमेश मानकर हे सेवानिवृत्त शिक्षक, आई उषा गृहिणी, तर भाऊ नामांकित कंपनीत अभियंता आहे.
अंशुमन यादव.....
चंद्रपूर:- चंद्रपुरातील जटपुरा गेट येथील अंशुमन यादव हे (२४२ वी रँक) पटकावून युपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. अंशुमन हे उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांचे वडील चंद्रपुरात वेकोलीमध्ये नोकरीला आहेत. वडिलांच्या प्रेरणेमुळे प्रशासकीय सेवेत आल्याचे अंशुमनने सांगितले. दिल्ली येथे राहून सनदी परीक्षेची तयारी केली. युवक-युवतींनी मोठे स्वप्न पाहावे आणि ते साकार करण्यासाठी प्रथम अभ्यासाला प्राधान्य द्यावे. समकालीन घडामोडींची अपडेट माहिती ठेवावी, आवडीचा विषय निश्चित करून स्वत:ला झोकून द्यावे, असा सल्ला अंशुमनने जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना दिला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने