वाढदिवशी युवकाने संपविली जीवनयात्रा. #Suicide

Bhairav Diwase

प्रेमकरणातून आत्महत्या केल्याची चर्चा.
(आधार न्यूज नेटवर्क उपसंपादक) राहुल थोरात
चिमूर:- तालुक्यातील खडसंगीजवळील वहानगाव येथील २७ वर्षीय तरुणाने वाढदिवसाच्या दिवशीच कडूनिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेत आत्महत्या केली. #Suicide
शुक्रवारी सकाळी ६.३० वाजताच्या सुमारास ही घटना उघडकीस आली असून, आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. मात्र, प्रेमप्रकरणातून त्याने आत्महत्या केल्याची चर्चा गावातील नागरिकांत आहे. सूरज बंडू कुडके असे मृत तरुणाचे नाव होते. तो शेडगाव जवळील सीएमपीडीआय कॅम्पमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून कामावर होता.
सूरजचा २ सप्टेंबरला वाढदिवस होता. त्याचा वाढदिवस असल्याने मित्र केक घेऊन घरी जमले होते. मात्र, सूरज सायंकाळी ७ वाजतापासून बेपत्ता होता. रात्री उशिरापर्यंत तो घरी आला नाही. त्यामुळे कुटुंबीय आणि मित्रांनी त्याचा शोध घेतला. मात्र, सूरजचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नाही. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील प्रभू दोडके यांच्या शेतातील निंबाच्या झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत सूरजाचा मृतदेह आढळला. दोडके यांनी गावात येऊन कुटुंबीयांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच वाहनगावचे सरपंच प्रशांत
कोल्हे यांनी शेगाव पोलिसांना सकाळी ७ वाजता घटनेची माहिती दिली. मात्र, शेगाव पोलिसांकडून कोणतीही दाद मिळाली नाही. त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. माहिती मिळाल्यानंतर तब्बल चार तासांनी पोलीस पोहोचले. अखेर शेगाव पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक सरोदे, सहाय्यक फौजदार धारणे घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतला व शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठविण्यात आला. सहा महिन्यापूर्वीही विष प्राशन करून त्याने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. पुढील तपास शेगाव पोलीस करीत आहेत.