जाहिरात... Advertisement... विज्ञापन

दारूबंदी सहा वर्षांनी उठवली.. भूगोल तुरुंगात यासह "या" घडामोडींनी चर्चेत राहिला चंद्रपूर जिल्हा
अखेर दारूबंदी उठली

सहा वर्षांच्या प्रतीक्षेनंतर अखेर चंद्रपूर जिल्ह्याची दारुबंदी उठविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. 1 एप्रिल 2015 मध्ये जिल्ह्यात दारुबंदी करण्यात आली. तेव्हापासूनच जिल्ह्यातील दारूबंदीच्या निर्णयाबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले होते. याबाबत तत्कालीन विरोधीपक्षाचे नेते विजय वडेट्टीवार यांनी देखील ठाम भूमिका घेतली होती. राज्यात सत्तापालट झाली आणि वडेट्टीवार हे जिल्ह्याचे पालकमंत्री झाले. त्यांनी आपण जिल्ह्यातील दारुबंदी उठविणार अशी घोषणा केली होती. अखेर आज 27 मे रोजी जिल्ह्यातील दारुबंदी हटविण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला.
ताडोबातील गतिरोधकांचा प्रश्न पेटला

ताडोबा-अंधारी व्याघ्रप्रकल्पामध्ये वाहनांमुळे होणाऱ्या वन्यजीवांच्या मृत्यूमुळे व्यवस्थापनाने मार्गावर 63 गतिरोधक निर्माण केले. बफर क्षेत्रात अनेक गावे असल्याने या गतिरोधकांचा त्रास गावकऱ्यांना होऊ लागला. त्यामुळे हे गतिरोधक हटविण्यात यावे अशी मागणी गावकऱ्यांनी केली. त्यामुळे ताडोबा व्यवस्थापन आणि गावकरी आमनेसामने उभे ठाकले. एवढ्यात 11 जूनला या वादाने पेट घेतला. सर्पदंशामुळे 16 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. गतिरोधकांच्या अडथळ्यांमुळे मुलाला वेळेत रुग्णालयात दाखल करता आले नाही त्यामुळे मुलाचा मृत्यू झाला आणि यासाठी ताडोबा व्यवस्थापन जबाबदार आहे असा आरोप गावकऱ्यांनी केला. दुसऱ्या दिवशी गावकऱ्यांनी या मुलाचा मृतदेह थेट ताडोबाच्या कार्यालयात आणून ठेवला. त्यामुळे येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले. अजूनही याबाबत गावकऱ्यांची तक्रार कायम आहे.
भारत बायोटेकच्या संस्थापकांची आनंदवनाला अनोखी भेट

जून महिन्यात कोरोनाची भयंकर लाट सुरू होती. याच दरम्यान लसीकरणाला देखील सुरुवात झाली होती. मात्र अनेक ठिकाणी लसीकरणाचा पुरवठा मर्यादित होता. कुष्ठरोग्यांसाठी नंदनवन ठरलेले आनंदवनाला मात्र या काळात अनोखी भेट मिळाली. भारत बायोटेक या कंपनीने कोवॅक्सिन लस विकसित केली होती. या कंपनीचे संस्थापक, अध्यक्ष आणि संचालक डॉ. कृष्णा ईल्ला हे आनंदवन येथील महाविद्यालयातच शिकले. एक माजी विद्यार्थी म्हणून छोटीसी परतफेड म्हणून आनंदवनला त्यांनी मोठा सुखद धक्का दिला आहे. त्यांनी गुरुदक्षिणा म्हणून तब्बल 4000 हजार लसींचा डोज त्यांनी थेट आनंदवनात पाठवला.
अखेर दुकाने उघडली

तब्बल पाच वर्षांच्या दारूबंदीनंतर अखेर 5 जुलैला जिल्ह्यातील दारूची दुकाने आणि बार सुरू झाले. यात पहिल्या दिवशी मद्यपींची अक्षरशः झुंबड उडाली. बारमध्ये येणाऱ्या गर्दीला बसण्यासाठी जागाच उरली नसल्याने पार्सलच्या माध्यमातून दारुविक्री करावी लागली. त्यातही असलेला दारूचा माल हातोहात विकल्या गेला.
भरदिवसा शहरात गोळीबार.

12 जुलैला चंद्रपूर शहरात भर दिवसा गोळीबार केल्याची घटना घडली. चंद्रपूर येथील रघुवंशी कॉम्प्लेक्स परिसरात एक बुरखाधारी युवक आला. त्या युवकाने परिसरातील एका युवकावर गोळीबार करून पळ काढला. यापूर्वी बल्लारपूर येथे सुरज बहुरिया याची हत्या करण्यात आली होती. त्याच्या हत्येमागे हा युवक गंभीर जखमी झाला.
एकाच कुटुंबातील सहा जणांचा झोपेत मृत्यू

13 जुलैला दुर्गापूर येथे एकाच कुटुंबातील सहा जणांचा झोपेत मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. दूर्गापुर येथील कंत्राटदार रमेश लष्कर यांचा मुलगा अजय लष्कर याचा नुकताच विवाह झाला होता. लग्नसमारंभाचे सर्व सोपस्कार पूर्ण झाल्यावर सर्व पाहुणे आपापल्या गावी गेले. आदल्या रात्री मुसळधार पाऊस आल्याने अचानक वीज खंडित झाली. यानंतर लष्कर कुटुंबाने जनरेटर लावले आणि सर्व जण झोपी गेले. सकाळी साडे सहा वाजताच्या दरम्यान कुटुंबातील सर्व जण उठून जातात. मात्र, उशिरापर्यंत यापैकी कोणीही उठले नाही. शेजारच्या लोकांनी पाहणी केली तेव्हा सहा जण झोपेतच मृत्युमुखी पडलेले आढळले. जनरेटरमधून विषारी वायूच्या गळतीमुळे त्यांचा मृत्यू झाल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते.
वीज जोडणीसाठी डोंग्याने प्रवास

चंद्रपूर परिमंडळातील बल्लारशा विभाग अंतर्गत पोंभुर्णा तालुक्यातील अगदी शेवटच्या टोकावर असलेले टोक (गंगापूर) गावातील ०२ कृषिपंप ग्राहकांचे कनेक्शन असलेल्या रोहित्रामध्ये बिघाड झाल्याने त्या ग्राहकांचा विजपुरवठा खंडित झाला होता. या गावात पोचण्यासाठी पक्का रस्ता नाही, नदी दुथडी भरून वाहत होती. अशा स्थितीत नदीत नाव सोडून रोहित्र या गावात नेण्यात आले. या घटनेची दखल खुद्द राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी घेतली. त्यांनी ट्विट करत चंद्रपूर परिमंडळाचे अभिनंदन केले.
जादूटोण्याच्या संशयावरून दलितांना अमानुष मारहाण

जिवती तालुक्यात पुरोगामी महाराष्ट्राला लाजवणारी घटना 23 ऑगस्टला उजेडात आली. जिवती तालुक्यातील वणी बुद्रुक या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दलित समाजातील महिला, वयोवृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण केली. या घटनेत ७ जण जखमी झाले तर पाच गंभीर जखमींना चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. या घटनेमध्ये शांताबाई भगवान कांबळे (५३), साहेबराव एकनाथ हुके (४८), धम्मशिला सुधाकर हूके (३८), पंचफुला शिवराज हुके (५५), प्रयागबाई एका जबर जखमी झाले. या प्रकरणात 13 जणांना जिवती पोलिसांनी अटक केली.
लसीकरणासाठी 'जान की बाझी

पोंभूर्णा तालुक्याचे शेवटचे टोक असलेले गंगापूर व गंगापूर टोक ही दोन गावे वैनगंगा नदीला वेढलेली आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्र नवेगाव मोरे अंतर्गत येत असलेल्या या गावांमध्ये ये-जा करण्यासाठी फक्त डोंग्याचा वापर करून प्रवास करावा लागतो. पावसाळ्यात चहू बाजूने पाण्याने वेढलेल्या गंगापूर गावाचे लसीकरण कसे करायचे हा यक्ष प्रश्न समोर आरोग्य यंत्रणेसमोर उभा होता. पोंभूर्ण्याचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदेश मामीडवार यांनी हे आवाहन स्विकारून गंगापूर गावात लसीकरण पार पाडण्यासाठीची मोहिम हाती घेतले. आरोग्य यंत्रणेतील अधिकारी व कर्मचारी यांना सोबत घेऊन त्यांनी चेक ठाणेवासना येथून साध्या डोंग्याचा वापर करून गंगापूर गाव गाठले. हा प्रवास मोठा थरारक आणि धडकी भरविणारा होता. गावातील आशासेविका व सामाजिक कार्यकर्ते यांना सोबत  घेऊन ३० आगस्टला कोव्हिशिल्ड लसीकरण सत्र आयोजित करण्यात आले. गंगापूर गावात शंभर टक्के लसीकरण पुर्ण करण्यात आले. 
चंद्रपुरात पडला फेसयुक्त पाऊस.

21 सप्टेंबरला चंद्रपुरात मुसळधार पाऊस झाला. या पावसासोबत साबणयुक्त फेस पडल्याचे वेगळेच चित्र बघायला मिळाले. चंद्रपूर शहराजवळ असलेल्या दुर्गापूर कोळसा खाण परिसरात हा प्रकार दिसून आला. मात्र याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. झाडांवर-गवतावर-रस्त्यावर अनेक ठिकाणी हा पुंजक्याच्या स्वरूपातील फेस नजरेस पडला. काही भागात तर या फेस पुंजक्यांचा वर्षाव बघायला मिळाला. सुमारे दीड ते दोन किलोमीटर परिसरात हा फेस पसरला होता. ज्या भागात फेस पडला, त्या भागात चंद्रपूर महाऔष्णिक वीज केंद्र आणि अनेक कोळसा खाणी आहेत. औष्णिक वीज केंद्र आणि कोळसा खाणीतून निघणाऱ्या वायू प्रदूषणासोबत पावसाच्या पाण्याचे संयुग झाल्याने हा फेस तयार झाल्याची शक्यता अभ्यासकांनी व्यक्त केली होती.
अन भूगोल तुरुंगात गेले

28 सप्टेंबरला प्रा. डॉ. योगेश दुधपचारे यांच्या घरून लॅपटॉप आणि ब्लुटूथ स्पीकर चोरीला गेला. याची तक्रार त्यांनी दुर्गापूर पोलीस ठाण्यात नोंदविली. यात पोलिसांनी तीन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांना पोलिसी खाक्या दाखवताच त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ह्या सर्वांना अटक करण्यासाठी आरोपींच्या नावांची विचारणा झाली. यामध्ये सुलेमान सुलतान शेख, राहुल राजेश मेश्राम यांची नावे नोंदविण्यात आली. मात्र तिसऱ्या आरोपीने आपले नाव सांगितले ज्यावर पोलिसांचा विश्वासच बसत नव्हता आरोपीचे नाव भूगोल आणि वडिलांचे नाव इतिहास असे सांगितले. त्याची सर्व ओळखपत्रे तपासले आणि पोलिसांची खात्री पटली. भूगोल इतिहास मानकर याच्यावर देखील गुन्हा नोंदवून त्याला अटक करण्यात आली.
 राष्ट्रवादी युवती काँग्रेसची पदाधिकारी निघाली दुचाकी चोर

11 नोव्हेंबरला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने चंद्रपूर शहर परिसरात एक युवक काळया रंगाची मेस्ट्रो मोपेड दुचाकी घेवून विक्री करीता ग्राहक शोधीत असल्या बाबत गोपीनिय माहिती मिळाली. त्या दुचाकी चोरास साफळा रचून ताब्यात घेवून त्याचे जवळील दुचाकीची तपासणी केली असता सदरची गाडी चोरीची असल्याचे निष्पन्न झाले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने तब्बल 11 दुचाकी चोरल्या असल्याची धक्कादायक कबुली दिली. त्यात राष्ट्रवादी युवती काँग्रेसची पदाधिकारी हिचा समावेश होता. आपल्या दोन मित्रांसह ती ह्या दुचाकी चोरण्यास महत्त्वाची भूमिका बजावत होती. हे समोर आले.

मुलगी भाव देत नाही; खचलेल्या तरूणाचे थेट आमदारानांच पत्र. 

 मला मुली भाव देत नाहीत. पटत नाहीत. हा माझ्यावर घोर अन्याय आहे. हा अन्याय मला असह्य झाला आहे. तेव्हा आमदार महोदय विधानसभा क्षेत्रातील यूवातीना तुम्ही प्रोत्साहन द्या. अन आम्हचा सारख्या तरूणांना लाईन द्यायला सांगा. अश्या आशयाचे पत्र थेट राजूरा विधानसभा क्षेत्रातील आमदारांना लिहीले. हे पत्र सध्या समाजमाध्यमात भलतेच चर्चिले जात आहे. राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक समस्याना समोर जात असताना एक नवीनच पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तर पत्र लिहिणारा नेमका कोण आहे? ज्याच्या नावाने अर्जदाराचे नाव टाकण्यात आले तो की दुसऱ्याचे नाव वापरून अर्ज सोशल मीडियावर व्हायरल केला तो नेमका कोण? असा संशोधनाचा विषय बनला. दोन दिवसांपासून सोशल मीडियावर असे पत्र व्हायरल होत आहे की, माननीय आमदार साहेब सम्पूर्ण तालुक्यात भरभरून मुली आहेत. पण मला एकही मुलगी पटत नसून ही चिंतेची बाब आहे. अर्जदार खेड्यागावातून असून राजुरा गडचांदूर रोज जाणे येणे करतो. परंतु त्याला एकही मुलगी पटत नाही असा मजकूर त्याने लिहिला दारू विकणाऱ्याला व काळ्या डोमळ्या पोरांना girlfriend असते. तर त्यांना बघून अर्जदाराचा जीव जळून राख होतो. तसा अर्जदार भूषण जांबुवंत राठोड यांनी आमदार साहेबाना विनंती केली की, राजुरा विधान सभा क्षेत्रातील मुलींना प्रोस्थाहन देऊन अर्जदाराला भाव देण्यात यावा. तर एकीकडे हा भूषण जांबुवंत राठोड कोण अशी चर्चा असून त्याने गावचे नाव नमूद केले नाही. हे पत्र आमदार साहेबांन पर्यंत पोहचले नाही. परंतु हे पत्र तुफान व्हायरल होत आहे.‌ 

30 वर्षीय तरुणाची हत्या; तर 2 जखमी.

 गेले कित्येक दिवस बल्लारपूरमध्ये हत्येची घटनेत वाढ झाली आहे, बेकायदेशीर कारवायांमुळे खुनाच्या घटनेत वाढ होत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार दि. 30 ऑगस्टच्या रात्री 9.30 वाजता स्केअर पॉइंट बेअर बारजवळ 30 वर्षीय तरुणाची धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आल्याची घटना घडली.
मृतक 34 वर्षीय मिलिंद बोन्दाडे किल्ला वार्ड निवासी आहे. मृतांना वाचवण्यासाठी आलेल्या तरुणांवर हल्ला करण्यात आला, त्यात संघपाल कामडे आणि इतरांचा एकाचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. बल्लारपूर मध्ये हत्या अवैध व्यवसायामुळे ही हत्या झाली आहे. काही दिवसांपूर्वी घडलेल्या चोरीच्या घटनेत मृत युवक आणि मारेकऱ्याचा सहभाग असल्याची बाब समोर आली आहे. सध्या बल्लारपूर पोलीस हत्येच्या घटनास्थळी दाखल झाले आहेत. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत