Top News

पर्यावरण संरक्षणासाठी झटणारी जिज्ञासू प्रणाली #chandrapur

अश्विन गोडबोले , चंद्रपूर ८८३०८५७३५१

पर्यावरण संवर्धन व संरक्षण या विषयावर बोलायचे झाल्यास त्यावर निव्वळ चर्चा करून उपयोग नसून या विषयाला धरून यातील निर्माण होणाऱ्या अनेक ज्वलंत प्रश्नांना आपल्या कृतीतून उत्तर देण्याचे धाडस आजच्या घडिला समाजात फार कमी लोक करत असताना दिसतात. विद्यार्थी जिवनात असताना शाळा, महाविद्यालय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमात पर्यावरणाचा दिवसेंदिवस होणारा ऱ्हास, वाढणारे प्रदुषण,मनुष्याची बदलती जीवनशैली, भोगणुकीच्या साधनांची वाढत जाणारी मागणी, महिला सक्षमीकरण अशा अनेक प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम वेगवेगळ्या उपक्रमांतून होत असल्याचे आपण बघीतले आहे.


मात्र विध्यार्थी जीवनातून बाहेर पडताच या सगळ्या सामाजिक समस्यांचा व प्रश्नांचा विसर आपल्याला पडत असतो.मुख्यत्वे तरुणवर्ग हा आपल्या कारकिर्दीची एक दिशा शोधत असतो जेणेकरून तो स्वतःच्या पायावर समर्थपणे उभा राहू शकेल परंतु सामाजिक भावनेतून बघायचे झाल्यास समाजाचे आपण काही देणे लागतो हा विचार करून जर प्रत्येकाने कृती केली तर आज आपल्याला या समस्यांना नक्कीच मात देता येईल व आपला ही त्यात खारीचा वाटा होईल या विचारांनी झपाटलेली अशीच एक ध्येयवेडी २१ वर्षीय तरुणी प्रणाली विठ्ठल चिकटे होय.



प्रणाली चिकटे या यवतमाळ जिल्यातील वणी तालुक्यातील पुनवट या छोट्याश्या गावच्या रहिवासी आहेत.आई,वडिल व तिघी बहिणी असा त्यांचा परिवार. चंद्रपूर येथील एस.आर.एम.कॉलेज येथुन त्यानीं सामाजिक कार्याची पदवी प्राप्त केली. शिक्षण घेत असतांनाच विविध सामाजिक विषयांवर त्यांनी प्रत्यक्ष कार्यक्षेत्रात उतरून संशोधन केले.हे सगळे करत असतांना त्यांना एक शेतकरी मुलगी असल्याने शेती करताना उदभवणारे अनेक प्रश्न आई वडिलांचे कष्ट,पर्यावरणाचा ढासळलेला समतोल व त्यामुळे होणारे शेतीचे नुकसान, वायूप्रदूषण इत्यादी प्रश्न त्यांना स्वस्थ बसु देत नव्हते येथुनच सुरू झाला त्यांचा या समस्त प्रश्नांच्या शोधात प्रवास व त्यांनी सायकलने महाराष्ट्रभर फिरून या सगळ्या विविध विषयांवर जनजागृती करण्याचे ठरवले व त्या एकट्याच आपल्या प्रश्नांच्या शोधात निघाल्या. सलग ४३५ दिवस एकटीनेच संपूर्ण महाराष्ट्रभर फिरून तब्बल १६८२० कि.मी. चा प्रवास त्यांनी सायकलने पुर्ण केला. या प्रवासात त्यांनी पर्यावरण संवर्धनासाठी फक्त कागदावर योजना न राबवता विचारांमध्ये गुंतून न राहता कृती करण्याची गरज असल्याचे महत्व त्यांच्या कृतीतून व केलेल्या विविध संकल्पाद्वारे लोकांना पटवून दिले.


प्रवासात आले अनेक अनुभव

संपूर्ण महाराष्ट्रात सायकलने प्रवास करत असतांना चांगले अथवा वाईट अनुभव देखील आले. काही मनमिळावू मदत करणारी लोक वाटेत मिळाली, लोकांनी त्यांच्या विचारांना चांगला प्रतिसादही दिला पण प्रवासात कधीकधी राहण्याची, खाण्याची व्यवस्था न होऊ शकल्यामुळे अनेकदा त्यांना मंदीरात सुद्धा झोपावे लागले, पोटाला मारून सुद्धा कशीबशी रात्र काढायची वेळ त्यांच्यावर आली वाटेत त्यांचा एकदा अपघात झाला परंतु खचून न जाता त्यातून सावरुन पुढिल प्रवास जोमाने सुरु केला व आपला प्रवास पुर्णत्वास नेला.

शहरात सायकल रॅलीद्वारे लोकांमधे जनजागृती करणे असो आश्रमशाळेत पर्यावरनाबद्दल जनजागृती कार्यक्रम राबवून गावात ग्रामस्थांसोबत चर्चेतून त्यांना पर्यावरण संवर्धनाचे महत्व पटवून देणे , वाटेत रुग्णालयांना भेट देऊन उप्रकमाची माहिती देणे, वृक्षारोपण कार्यक्रम इत्यादी घेतले.

गावागावांत  जाऊन वृक्ष लागवडीचे महत्व संवर्धन व जतन, प्रदूषणाला कसा आळा  घातला जाईल, सायकलीचे महत्व , प्लास्टिक बॅगेच्या वापराला आळा, पाणी बचत व जिरवणे आणि या प्रयत्नांमध्ये अनेक लोकांना जोडणे  या सगळ्या संकल्पना त्यांनी शाळा, महाविद्यालये, गावचौपाटी इत्यादीवर राबविल्या. त्यांच्या या प्रवासात त्यांना अनेक चांगल्या - वाईट अनुभवांना सामोरे जावे लागले असले तरी त्यांनी माघार न घेता निस्वार्थपने आपले समाजोपयोगी कर्तव्य पार पाडले. येणाऱ्या काळात शेती व मानवी जिवनशैली या दोन विषयांवर संशोधन करण्याची त्यांची तयारी आहे अशी ईच्छा त्यांनी व्यक्त केली. पर्यावरण संवर्धन व प्रदुषण नियंत्रण या विषयांना घेऊन एक लोकचळवळ उभी करणार असल्याचे त्यांनी सांगितले पण यासाठी युवावर्गाचा मिळणारा अल्प असा प्रतिसाद हा एक गंभीर प्रश्न असल्याचे त्यांनी म्हटले. एक महिला म्हणुन सांगायचे झाल्यास महिलांनी स्वतंत्र विचारसरणी अवलंबुन स्वतःला आजच्या युगात सिद्ध करण्याचे धाडस  ठेवले पाहिजे असे त्या म्हणाल्या. 

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने