Top News

आधी वाघाचा हल्ला, आता बिबट्याचा धुमाकूळ; नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण tiger tigerattack #Leopard #Leopardattack

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
चंद्रपूर:- बामणीजवळील केम गावात बुधवारी पहाटे बिबट्याने तीन जनावरांवर हल्ला चढविला. एका वासराला घेऊन जंगलात पळाला. हे जनावर आलाम नावाच्या व्यक्तीचे होते. मंगळवारी पहाटे अमितनगरजवळील सतीश शेरकी यांच्या गोठ्यातील तीन वासरे बिबट्याने ठार केली. याचा पंचनामा क्षेत्र सहायक नरेश भोवरे यांनी केला. २४ जानेवारीला येडशीच्या मनोज लालल्लूप्रसाद यांची दोन कालवडे वाघाने ठार केली. यामुळे बामणीवासी धास्तावले आहे. बुधवारी सकाळी बेघर वस्तीतील महिलांनी ग्रामपंचायतीत जाऊन वाघ आणि बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी केली.
बामणी परिसरात वाघाचे अडीच महिन्यांपासून वास्तव असून आता बिबट सैराट झालेला पाहून वन विभागाने सर्चिंग ऑपरेशन सुरू केले आहे. जीवावर उदार होऊन हातात काठ्या घेऊन वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष थिपेंसह क्षेत्र सहायक नरेश भोवरे व त्यांची चमू दिवसरात्र वाघ आणि बिबट्याच्या पाळतीवर आहे. फटाके फोडणे सुरू आहे. परंतु वाघ आणि बिबट जिकडे फटाके फोडले त्याच्या दुसऱ्या बाजूने निघतात, असा लपंडाव सुरू आहे.
आतापर्यंत वाघाने एक मानव व १५ जनावरांना ठार मारले आहे. आता बिबट आल्याने बामनीवासी व जवळील अमितनगर, केममधील रहिवासी भयभीत झाले आहे. तर बालाजी हायस्कूलजवळ रात्री वाघाने डरकाळी फोडल्याने शिक्षक काॅलनीचे नागरिक धास्तावले आहे.
सुभाष ताजने, सरपंच
ग्रामपंचायत, बामणी
वन विकास महामंडळाच्या जवळ असलेल्या शेताजवळ दोन बिबट रात्रीच्या वेळेस येतात, परंतु अजूनपर्यंत त्यांनी मानवावर हल्ला केला नाही. मात्र या परिसरात बिबट, वाघाचा वावर आहे. यामुळे सावध राहिले पाहिजे.
डॉ. अनिल काकडे, बल्लारपूर.
बामनीत सुरू वन्यप्राणी मानव संघर्षप्रकरणी मंगळवारी उपविभागीय कार्यालयात झालेल्या शासकीय बैठकीत चर्चा झाली आहे. याबाबत लवकरच तोडगा काढण्यात येईल.
संतोष थिपे, वन परिक्षेत्र अधिकारी, बल्लारशाह

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने