अचानक पाळण्याची दोरी तुटल्याने बहिण-भावाचा मृत्यू

Bhairav Diwase
यवतमाळ:- पुसद शहरातील लक्ष्मीनगरमध्ये लहान भावाच्या पाळण्याचा झोका झुलवित असताना पाळण्याची दोरी अचानक तुटून सिमेंट खांब जमिनीवर पडल्याने भावा-बहीणीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना पुसद शहरातील लक्ष्मीनगरमध्ये घडली. या विचित्र दुर्घटनेत मृत्यू झालेल्या बहीण-भावाची नावे प्राची विजय घुक्से (९ वर्षे) आणि तेजस विजय घुक्से (६ महिने) अशी आहेत. 
सहा महिन्याच्या भावाला पाळण्याचा झोका देत असताना अंगावर सिमेंट खांब कोसळून बहीण-भावाचा यात मृत्यू झाला. बहीण लहान भावाला झोक्यावर झुलवत होती. त्यावेळी झोक्याची एक दोरी लोखंडी खांबाला, तर दुसरी दोरी सिमेंट खांबाला बांधलेली होती. यात सिमेंट खांब अचानक कोसळला. तो आधी प्राचीच्या डोक्यावर आदळला त्यामुळे ती जागीच ठार झाली. तर पाळण्याची दोरी तुटल्याने तेजस जमिनीवर फेकला गेला. त्यात तो गंभीर जखमी झाला. उपचारादरम्यान तेजसचाही मृत्यू झाला. या दोन चिमुकल्यांच्या मृत्यूमुळे त्यांच्या घरावर शोककळा पसरली असून या घटनेमुळे नागरिक हळहळ व्यक्त करत आहेत.